करमाळासोलापूर जिल्हा

गोविंदपर्व कारखान्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन

करमाळा समाचार – संजय साखरे 

करमाळा तालुक्यातील राजुरी येथील गोविंदपर्व गूळ पावडर कारखान्यावर आज सकाळी राजुरी, मांजरगाव, उंदरगाव, वाशिंबे येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या थकीत ऊस बिलासाठी आंदोलन करून व्यवस्थापनाला जाब विचारला.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, राजुरी येथील गोविंद पर्व गूळ पावडर कारखान्याची निर्मिती सन २०१० -११ च्या दरम्यान झाली. त्यामध्ये तयार होणारे सेंद्रिय गुळ पावडरला पतंजली कडून मोठी मागणी होती. परंतु त्यानंतर व्यवस्थापनाच्या धोरणामुळे या कारखाना आर्थिक दुरावस्थेत सापडला. सन 2018- 19 च्या गाळप हंगामात कारखान्याने शेतकऱ्यांना दोन हजार रुपये भाव देऊ म्हणून ऊस गाळपास आणला होता, परंतु त्यांनी काही शेतकऱ्यांना पंधराशे रुपये तर काहींना एक हजार रुपये प्रति टन याप्रमाणे पैसे दिले.

याशिवाय या कारखान्यात काम करणारे कामगार, वाहतूक ठेकेदार, यांची देणीही कारखाना व्यवस्थापनाने थकवले आहेत. या संदर्भात शेतकर्‍यांनी आज सकाळी कारखान्यावर आंदोलन केले आणि आपल्या कामाचा व कष्टाचा पैसा देण्याची जोरदार मागणी केली.

गेल्या दोन वर्षापासून पूर्णपणे बंद असलेला कारखाना चालू गाळप हंगामात चालू होणार असल्याने कारखान्याने आमची मागील देणे पूर्ण करूनच कारखाना चालू करावा ,अन्यथा कारखाना चालू करून देणार नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

मी सन 2018 19 च्या गाळप हंगामात माझ्या ट्रॅक्टरने वाहतूक केलेल्या वाहतूक व तोडणीचे पैसे कारखान्याने दिले नाहीत. या संदर्भात आज आम्ही कारखान्यावर गेलो होतो. कारखाना चालू होण्याच्या अगोदर देणे देण्याचे चेअरमन ने मान्य केले आहे -रामहरी गरदडे ,वाहतूक ठेकेदार, उंदर गाव

माझ्या जवळपास एक वर्षाचा पगार थकीत असून कारखान्यांनी हा पगार देण्यास टाळाटाळ चालवली आहे. यासंदर्भात आपण आज कारखाना चेअरमन शी बोललो असता त्यांनी उद्धट उत्तरे दिली- गणेश जाधव ,कामगार

सन 2018 19 च्या गाळप हंगामात मी घातलेल्या उसाचे बिल मला फक्त पंधराशे रुपये प्रति टन याप्रमाणे मिळाले असून अजून पाचशे रुपये प्रति टन याप्रमाणे पैसे येणे बाकी आहे-दत्तात्रय साखरे, ऊस उत्पादक शेतकरी, राजुरी

सर्व कामगार ,ऊस ऊस उत्पादक शेतकरी व वाहतूक ठेकेदार यांची देणी देण्यास मी बांधील असून या सर्वांचे पैसे कारखाना सुरू होण्यापूर्वी देण्यात येणार आहेत. दिवाळीपूर्वीच यांची सर्व देणी देण्यात येतील व नंतरच कारखाना सुरू करण्यात येईल.
-चंद्रशेखर जगताप,चेअर मन,गोविंदपर्व गुळ पावडर कारखाना,राजुरी

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE