रखडलेल्या जलजीवन योजनेमुळे अनेकांचे ‘जीवन’ विस्कळीत ; जुन्या व नव्या ठेकेदारांसह योजना गोत्यात
करमाळा समाचार – विशाल घोलप
जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये तब्बल जिल्ह्यातून ५० कोटींपेक्षा देणे रखडल्यामुळे संबंधित कामे अडचणीची ठरू लागले आहे. तर कर्ज काढून कामाला सुरुवात केलेल्या ठेकेदाराची अवस्था दयनीय होऊन बसली आहे. यामुळे सदरची कामे रखडण्याची शक्यता असून येणाऱ्या काळात जवळपास ९६० ठिकाणी सदरची योजना रखडली जाऊ शकते. त्यामुळे त्याचा परिणाम गावच्या पाणीपुरवठ्यावर होणार आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत गावा गावातून पाण्याची व्यवस्था होण्यासाठी शासनाच्या वतीने योजना राबवण्यात आली. २०२२-२३ मध्ये सुरू झालेल्या या योजनेमध्ये सुरुवातीला काम सुरू झाल्यानंतर निधी वेळेवर येत असल्याने कामाला व्यवस्थितरित्या सुरुवात करण्यात आली होती. पण नंतर मात्र सप्टेंबर महिन्यापासून सदरच्या योजनेतील निधीचा तुटवडा जाणवू लागला व संबंधित ठेकेदारांचे हप्ते मिळणे बंद झाले. यामुळे सदरच्या कामावर याचा परिणाम दिसू लागला. काम रखडले त्यामुळे बिले रखडली व रखडलेल्या बिलांमुळे पाण्याचा प्रश्न वाढू लागला.
मध्यंतरी झालेल्या निवडणुका व इतर कारणांमुळे संबंधित निधी उपलब्ध होऊ शकला नाही असे कारणे समोर येत राहिली. पण याच्या माध्यमातून कामाला सुरुवात करूनही जवळपास ९६० कामांपैकी केवळ ५० कामे पूर्ण झालेली असल्याचे दिसून येते. तर मार्चपासून केवळ आठ ते दहा कोटी निधी उपलब्ध झाल्याची माहिती मिळत आहे. मुळातच या सर्व योजनेला केवळ निधीची अडचण नसून या ठिकाणी जागा उपलब्ध करून देणे व इतर तक्रारी त्यामुळे काही कामे रखडलेली दिसून येतात. साधारणतः एखादे काम २५ लाखांपासून पाच कोटींपर्यंत असल्याचे दिसून येते तर पाच कोटी पुढील कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून केली जातात.
जुन्या ठेकेदारासह सुशिक्षित बेरोजगार अडचणीत …
शासनाकडून सुशिक्षित बेरोजगारांना या ठिकाणी काम देण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे तीन कोटी पर्यंत ची कामे सुशिक्षित बेरोजगारांना देण्यात आली. पहिल्यांदाच ठेकेदार झालेल्या या ठेकेदारांना काम मिळाल्यामुळे त्यांनी पैशाची गुंतवणूक करीत असताना वेगवेगळ्या ठिकाणाहून पैसे गोळा केले परंतु आता हे पैसे अडकल्यामुळे पहिल्याच कामात अडचणीत आल्याचे दिसून येते. तर मुरब्बी ठेकेदारांनी एकाच वेळी बरीच कामे घेतल्याने त्यांचेही सर्व पैसे अडकून राहिले आहेत. त्यामुळे जुन्या व नव्या दोघांचीही अडचण वाढली आहे. त्यामुळे संघटनेच्या अध्यक्षांनीच एकदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे दिसून आले होते.
नोव्हेबर मध्ये ५० कोटींची मागणी….
जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांसाठी अभियान संचालक राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी २६ नोव्हेंबर २४ रोजी पाठवलेल्या पत्रामध्ये पन्नास कोटी रुपयांची मागणी केली आहे. सदरचे ५० कोटी मंजूर झाले तर आतापर्यंत झालेल्या कामाच्या मोबदला मिळाल्याने संबंधित ठेकेदारांना दिलासा मिळू शकतो. परंतु सदरचा निधी कधी उपलब्ध होईल याची शाश्वती सध्या कमीच असल्याने ठेकेदार हवालदिल झाले आहेत. त्यामुळे पालक मंत्र्यानी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी ठेकेदार संजय फरतडे (करमाळा) यांनी केली आहे.
१४७ कोटी माघारी गेले…
जिल्ह्यात एकूण ९६० ठिकाणी कामे सुरू आहेत. तर यातील जास्तीत जास्त ५० कामे पूर्ण झालेली असतील. त्यासाठी मार्चपासून केवळ आठ ते दहा कोटी निधी उपलब्ध झाला. तर मुदतीत काम पूर्ण न केल्याचा ठपका ठेवत शासनाचा आलेला १४७ कोटींचा निधी हा माघारी गेल्याचे माहिती मिळाली आहे. यामुळे सुशिक्षित बेरोजगारा सह जुने ठेकेदारही अडचणीत सापडले आहेत. येणाऱ्या काळात वेळेवर पैसे न आल्यास संबंधित ठेकेदार कोणताही मार्ग अवलंबू शकतात. त्यांच्या जीवितालाही धोका आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
– आनंद तोडकरी, जिल्हाकार्याध्यक्ष
पाणीपुरवठा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन सोलापूर