सोलापुर विद्यापीठ क्रिकेट सामने – वायसीएम क्रिकेट मैदानावर दोघांची शतके ; वालचंद , संगमेश्वर विजयी
करमाळा समाचार
पुण्यश्लोक अ.हो. विद्यापीठ सोलापूर अंतर्गत करमाळ्यात सुरू असलेल्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये आज दोन चाळीस षटकांचे सामने खेळवण्यात आले. यामध्ये अटीतटीच्या लढतीत वालचंद कॉलेजने सांगोला महाविद्यालयाला एक विकेट राखून तर दुसऱ्या सामन्यात दोन फलंदाजाच्या शतकांच्या जोरावर संगमेश्वर महाविद्यालयाने सोलापूर यशवंतराव चव्हाण विद्यालयाला २३५ धावांनी पराभूत केले.
सांगोला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार निर्णय घेतला होता. ४० षटकांमध्ये सर्व बाद २६० धावांपर्यंत सांगोला संघाला मजल मारता आली. त्यामध्ये सत्यजित गवळी ६६ चेंडू ६६ धावा व शिवतेज पाटील ५१ चेंडूत ४९ धावा यांची खेळीच्या जोरावर २६० धावा जमवण्यात यश आले. तर वालचंद संघाकडून आठ षटकात ६५ धावा देत तीन बळी सिद्धांत काळे यांनी घेतले. त्यानंतर वालचंद कॉलेज फलंदाजीसाठी आल्यानंतर सिद्धांत काळे याने ६२ धावा, अक्षय देशमुख ४४ धावा तर अंतिम शतकापर्यंत लढत राहिलेला शौकील शेख यांनी ६८ धावा करीत सांगोल्याला विजयापर्यंत नेले. सांगोला संघाच्या सत्यजित गवळीने आठ शतकात ५७ धावा देत चार बळी मिळवले त्यामुळे सामना हा अंतिम षटकापर्यंत रंगतदार स्थीतीत पोहोचला होता. अखेर वालचंद संघाने एक विकेट राखून सामना जिंकला.
तर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयावर झालेला संगमेश्वर सोलापूर व वाय सी एम करमाळा हा सामना संगमेश्वर महाविद्यालयाने एकतर्फी जिंकला. या सामन्यात संगमेश्वर महाविद्यालयाच्या विवेक आंचीने अष्टपैलू कामगिरी करीत १२९ धावा खेचल्या तसेच गोलंदाजी करताना पाच षटकात २३ धावा देत पाच बळीही घेतले. त्याच्या नंतर कर्णधार वैष्णव जावळे यांने १५५ धावा करुन सामना वाय सी एम कडुन लांब नेला. तब्बल ३६५ धावांचे लक्ष गाठताना वायसीएमची दमछाक उडाली. संगमेश्वर संघाने सामना २६० धावांनी जिंकला. तर वायसीएम कडुन अरबाज शेख ४० रणांचा संघर्ष अपुरा पडला. पंच म्हणुन श्री. कुलकर्णी व चंदु मंजेली यांनी तर गुणलेखक म्हणून अमोल कोरे व आर. एस. काळे यांनी काम पाहिले.