नाराजी बघुन मशालीकडे जाऊ शकतात, पण तुम्ही दक्षता घ्या ; आधीही फक्त गट वाढवला आता सावध राहण्याचे आवाहन
करमाळा समाचार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांची व त्यांच्या समर्थकांची मते जाणून घेण्यासाठी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी करमाळा विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे नेते हनुमंत मांढरे पाटील यांनी आपलं मत व्यक्त करताना सांगितले.

बोलताना मांढरे म्हणाले की, गेल्या पाच वर्षापासून आम्ही पक्षाचं काम निष्ठेने व प्रामाणिकपणे नेतृत्वविना करत आहोत. आमदार संजयमामा शिंदे पक्षाच्या मतावर निवडून आले. पण निवडून आल्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कधीच विचारात घेतलं नाही. त्यांनी त्यांचा गट वाढवण्याला प्राधान्य दिले. अपक्ष उमेदवार संजय पाटील घाटणेकर यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. पण ऐनवेळी त्यांना माघार घ्यायला लावून अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना पाठिंबा दिला. जर पाठिंबा दिला नसता तर आज करमाळा विधानसभेचे चित्र वेगळे दिसले असते.

महायुती बाबत सर्वसामान्य जनतेमध्ये असणारी नाराजी लोकसभेमध्ये पाहिली आहे. याचा विचार करता विद्यमान आमदार मशाल कडे जाऊन महाविकास आघाडी कडे हि जागा मागू शकतात. या बाबतीत आपण दक्षता घेऊन ही जागा आपल्या पक्षाला मिळून माजी आमदार नारायण पाटील यांना उमेदवारी जाहीर करावी. त्यांच्या सोबत आम्ही खंबीरपणे उभे राहून त्यांना निवडून आणू असे मत मांढरे पाटील यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे युवा नेते संतोष वारे यांनी आपण इच्छुक असल्याचे सांगितले. आ. जयंत पाटील यांनी आपण आबांच्या पाठीशी उभे रहा असे सांगून प्रदेशाध्यक्ष यांनी नारायण पाटील यांची उमेदवारी जाहीर करून टाकली. तर पक्ष तुमच्याही निष्टेला विसरणार नाही असे सांगितले.