साहेब.. तुमचा झेड पी वर भरोसा न्हाय काय ? थकीत वीजबीला वरुन महावितरण झेड पी समोरासमोर
करमाळा समाचार
वीज बील थकवल्याप्रकरणी करमाळा तालुक्यातील कोर्टीसह तीन प्राथमिक आरोग्य केंद्रावरील कनेक्शन कट केल्यामुळे कोर्टी येथील प्राथमिक आरोग्य केद्रातील लस व औषधी सुस्थितीत ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. वीज कट केल्यामुळे लहान मुलांच्या लस इंजेक्शन आधी खराब होण्याचा धोका संभवत आहे. तर वरिष्ठांचे आदेश असल्याने कनेक्शन तोडणी केल्याचे महावितरणचे अधिकारी सांगत आहेत. यामुळे वरिष्ठांचा सरकारी यंत्रणेवरच भरोसा नाही का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

मुळातच अशा प्रकारच्या आरोग्य विभागातील विजेचे बिल हे साधारणतः चार ते पाच महिन्यांपर्यंत भरले जात होते. यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना सांगून किंवा माहिती देऊन सदरचे बिले एकाच वेळी मान्यता मिळाल्यानंतर भरली जात होती. पण यंदाच्या वेळी वरिष्ठांच्या आदेशानुसार कोर्टीसह इतर ठिकाणची वीज कट करण्यात आले आहे. त्यामुळे गोंधळ उडाला आहे. आता पर्यत चार महिण्याचे बेचाळीस हजार रुपये भरणा करणे असल्याने कोर्टी येथे कपात झाली आहे.

करमाळा तालुक्यातील कोर्टी प्राथमीक आरोग्य केंद्र सह तीन ठिकाणची वीज तोडणी महावितरणच्या वतीने करण्यात आली आहे. सदरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लस, इंजेक्शन, रोगप्रतिबंधात्मक लस याशिवाय गरोदर मातेची प्रसूती, साप, विंचू, एक्सीडेंट पेशंट यांना सेवा दिली जाते. परंतु कोणतेही नोटीस न देता वीज कट करण्यात आली आहे. दवाखान्यात औषधे हे फ्रिजमध्ये योग्य तापमानात ठेवावी लागतात. त्यामुळे कोर्टी उपकेंद्रात विजेची अत्यावश्यकता आहे. तरी कनेक्शन कट केल्यामुळे या ठिकाणी इंजेक्शन व लसी सुस्थितीत ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. या संदर्भात आरोग्य विभागाने महावितरणला निवेदन देऊनही त्याच्यावर त्यांनी कसल्याही प्रकारची सहानुभूती दाखवली नाही.
आम्ही आमचे काम केले …
कोर्टी प्राथमिक आरोग्य केंद्राचे मागील चार महिन्यापेक्षा जास्त वीज थकीत आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाने जास्त दिवस थकीत असलेल्या ठिकाणी वीज कट करण्यात येत आहे. यासंदर्भात संबंधित विभागाने वरिष्ठांची चर्चा करून निर्णय घेतल्यास योग्य ठरेल. मुळातच वीज कट केल्यामुळे येणाऱ्या अडचणी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तो त्यांनी निस्तरला पाहिजे. आम्ही आमचे काम करत आहोत.
– ए. एस. कलावते, कार्यकारी अभियंता, महावितरण करमाळा
पत्र स्विकारण्यास नकार …
लस व औषधे फ्रीजमध्ये योग्य तापमानात ठेवण्यासाठी विजेची गरज असते. तरी कुठल्याही प्रकारचे लेखी पत्र अथवा नोटीस न देता वीज कट करण्यात आली आहे. वीज कनेक्शन घेतल्यापासून जिल्हास्तरावरून अनुदान प्राप्त झाल्यानंतर व्याजासहित रक्कम अदा केली जाते. तसेच यंदाही सदर अनुदान प्राप्त झाल्यानंतर रक्कम अदा करण्यात येणार होती. पण अचानक कनेक्शन तोडल्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झाल्यास महावितरण त्यास जबाबदार राहील असे पत्र कोर्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी यांनी दिले आहे. तर याबाबत वरिष्ठानी महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधुन माहीती दिली आहे.