पोंधवडी प्रकरण सर्वांसाठी धोक्याची घंटा ; वेळीच लगाम घालण्याची गरज
करमाळा समाचार
अनैतिक संबंध, प्रॉपर्टीचा वाद व जीवाला धोका अशा वेगवेगळ्या कारणातून पतीनेच सुपारी देत पत्नीचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरचे प्रकरण मंगळवारी दि. १६ रोजी पोंधवडी ता. करमाळा येथील वाघ वस्ती या ठिकाणी घडले होते. यामध्ये यापूर्वी तक्रारीवरून पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले व त्याच्याकडून सखोल तपास केल्यानंतर पतीनेच खून करण्यासाठी सांगितले.

सुपारी प्रकरणात कर्जत कनेक्शन दिसुन आले आहे. तर आतापर्यंत सहा संशयित आरोपी ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही सुपारीचे लोण पसरले आहे. याशिवाय युवकांचा या घटनेत समावेश दिसुन येतो त्यामुळे आपण कुठल्या दिशेने जातोय ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष देणे गरजेचे होतेच पण आता प्रशासनानही अधिक सतर्क व्हावे लागणार आहे. छोटे मोठे गुंड वेळीच थंड करणे गरजेचे आहे.

सुपारी प्रकरणातील अधिक माहीती अशी की, कोमल बिभीषण मत्रे (वय २३) असे मयत महिलेचे नाव आहे. तर तिच्या खून प्रकरणात पती बिभिषण विलास मत्रे (वय २६) रा. पोंधवडी, रोहन प्रदीप मोरे (वय २०) जलालपूर ता. कर्जत, सुनील विष्णू शिंदे (वय ३९), प्रदीप उर्फ दीपक सुनील हिरभगत (वय ३२) दोघेही रा. भांबोरा ता. कर्जत, विशाल परशुराम सवाणे (वय २३), मूळ रा. जाचकवस्ती, बारामती ता. इंदापूर सध्या रा. भांबोरा कर्जत, ऋषिकेश अनिल शिंदे (वय २२) रा. भांबोरा कर्जत असा अटक केलेल्याची नावे आहेत. पुढील तपास सुरु आहे.
याबाबत अधिक माहीती अशी की, कोमल हिचा गावातील मत्रे कुटुंबात विवाह झाला होता. पण वैवाहिक तक्रारीतून कोमल आपल्या माहेरी राहत होती. तिला तीन वर्षाचा एक मुलगा होता. पती पत्नी दोघांतील वाद कोर्टापर्यंत जाऊन पोहोचला होता. तर तिचे गावातील एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध पतीला माहीत होते. शिवाय कोमल प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मागत होती आणि पती बिभिषण याला कोमल पासून जीवाचा धोका होण्याची भीती वाटू लागली होती.
त्यामुळे तिने आपल्याला संपवण्याऐवजी आपणच तिला आपल्या रस्त्यातून बाजूला काढू असा त्याने विचार केला व आपल्या विश्वासातील एकास सांगून कर्जत तालुक्यातील काही युवकांचा त्याने संपर्क केला. यावेळी त्यांना साडेआठ लाख रुपयांची सुपारी दिली व कोमल हिचा खून करण्याचे सांगितले. त्यानंतर कर्जत भागातील प्रदीप, विशाल व ऋषिकेश यांनी मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घरात प्रवेश केला व घरातील इतर सदस्यांचा मोबाईल घेऊन दुसऱ्या खोलीमध्ये बंद केले. त्यानंतर कोमल हिच्या डोक्यात पाठीमागून कोयत्याने वार करून तिला गंभीर जखमी करून तिचा खून केला. वार इतके गंभीर होते की कोमल हिचा जागीच मृत्यू झाला.
यावेळी सदर प्रकरण दरोड्याकडे वळवण्याचा प्रयत्नही केला गेला. पण घटनेवरून सदर प्रकरण केवळ खुनासाठी घडवले असल्याचे निष्पन्न झाले होते. त्या आधारे पोलिसांनी तपास केला. यामध्ये डॉग स्कॉड व इतर महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांनी गोळा करीत प्रमुख आरोपीच्या मुस्क्या आवळल्या व त्याच्या माध्यमातून इतर आरोपींचा शोध घेतला.
तपासात पोलीस अधिक्षक शिरिष सरदेशपांडे, मा. अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, जालिदर नालकुल, उपविभागीय पोलीस अधिकारी, बार्शी उपविभाग बार्शी, अजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा उपविभाग करमाळा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री. विनोद घुगे, सहा.पो नि. श्री. रोहित शिंदे, पो.उप.नि.श्री. ज्ञानेश्वर दळवी, पो.उप. निरी. बनकर,
तसेच करमाळा पो. स्टे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहवालदार अजित उबाळे, पोना मनिष पवार, पोना वैभव ठेंगल, सोमनाथ जगताप, पोकॉ. तौफीक काझी, पोकॉ गणेश शिंदे, पोकॉ ज्ञानेश्वर घोंगडे, पोकॉ अर्जुन गोसावी, त्याचप्रमाणे पोहवा मंगेश पवार, पोहवा आप्पासाहेब लोहार, पोहवा अझरूदीन शेख, पोहवा बालाजी घोरपडे, पोहवा डोंगरे, पोकॉ शेखर बागल, पोकॉ हनुमंत भराटे, पोकॉ समीर शेख, चापोकॉ आनंद पवार सायबर पोलीस स्टेशन कडील पोना व्यंकटेश मोरे व स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांनी कसोशीने प्रयत्न करून नमुद गुन्हा उघडकीस आणला आहे.