करमाळ्यात लोकांची हिंदु मुस्लिम वादा ऐवजी उद्योग योजनांना पसंती
करमाळा समाचार
करमाळा येथील अतिक्रमण विरोधात सकल हिंदु समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व भाजपा नेते नितेश राणे करीत होते. पण तालुक्यातील प्रश्नावर स्थानिक लोकांचा उघड विरोध नव्हता शिवाय राणे पिता पुत्र यांची जरांगे पाटील यांच्या विरोधातील भूमिका याचे पडसाद करमाळ्यात पहायला मिळाले. मोठमोठे मोर्चे काढणारे मराठा बांधव सदर मोर्चा पासून अलिप्त राहिल्याचे दिसून आले. तर सामान्य लोकांनीही हिंदू मुस्लिम ऐवजी उद्योजक मेळाव्याला दिलेल्या पसंतीवरून लोकांना काय अपेक्षित आहे हे दाखवून दिले.
करमाळा येथील छत्रपती चौक परिसरात सदरच्या मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. यावेळी सुरुवातीपासूनच मोर्चाला अपेक्षित अशी गर्दी दिसून आली नाही. करमाळा येथील दत्त मंदिरापासून मोर्चा निघाला सुभाष चौक मार्गे छत्रपती चौक परिसरात सदरचा मोर्चा पोहोचला व त्या ठिकाणी उपस्थितांपैकी प्रमुख नितेश राणे, हभप संग्राम पाटील व सागर बेग यांची भाषणे झाली.
सदरच्या मोर्चाची चर्चा मागील आठवडाभरापासून होती. मोर्चात काहीतरी आक्रमक भाषणे होऊन दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी शक्यता असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. विशेष म्हणजे आंदोलकांपेक्षा पोलिसांचीच गर्दी अधिक असल्याचे दिसून येत होते. यापूर्वी करमाळा तालुक्यातून वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांशिवाय अधिकाऱ्यांचेही फोन राणे यांना गेले असल्याचे त्यांनी भाषणात उल्लेख केला. तर अनुचित प्रकार घडू शकतो त्यामुळे मोर्चा काढू नये अशी सूचना या ठिकाणाहून मिळत होती असेही त्यांनी सांगितले. पण कायम हिंदूंनीच का सहन करायचे व माघार घ्यायची असे म्हणत यावेळी अधिकाऱ्यांनाही राणे यांनी खडे बोल सुनावले व अतिक्रमण व लव जिहाद व इतर मार्गांमध्ये जो मुस्लिम धर्मीयांना सहकार्य करेल अशा अधिकाऱ्यांना आपण पाकिस्तानला पाठवू असा इशाराच यावेळी भर सभेत देऊन टाकला.
भाषणादरम्यान राणे यांची बऱ्याच वेळा जीभ घसरल्याचेही दिसून आले. इतर धर्मियांबाबत बोलताना त्यांनी कमरेखालची भाषा ही वापरली. पोलिसांनी काळजी म्हणून चहूबाजूंनी बंदोबस्त ठेवला होता. सदर मोर्चादरम्यान मुस्लिम धर्मियांसह पोलीस प्रशासन व तहसील अधिकाऱ्यांनाही राणे यांनी धारेवर धरले होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख वक्तयांसह अमोल पवार, भारत वांगडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय घोरपडे यांनी केले.
सामान्यांची उद्योजक मेळाव्याला पसंती…
करमाळा तालुक्यात आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये एकीकडे भाजपा पदाधिकाऱ्यांकडून आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शन मराठा उद्योजक मेळावा तर दुसरीकडे नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमणाच्या विरोधात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सामान्य लोकांसह पदाधिकाऱ्यांकडून जन आक्रोश मोर्चाला पाहिजे इतका प्रतिसाद मिळाला नसला तरी उद्योजक मेळाव्याला उत्तम प्रतिसाद मिळाला यातून जनतेला काय पाहिजे हे दिसून आले.
उघड पुढाकार नसल्याने गर्दी घटली …
करमाळा शहरात देवीचा माळ रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणाबाबत समाज माध्यमातून सुरुवातीला हिंदू समाज गोळा करण्याचे काम सुरू होते. बरेच दिवस करमाळा पोलीस ठाणे येथे कसलीही माहिती न देता सर्वत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना येण्याचे आवाहन केले जात होते. त्यामुळे यामागे नेमके कोणाचे नेतृत्व आहे हे लक्षात येत नव्हते. शिवाय प्रमुख पदाधिकारी हिंदुत्ववादी संघटना यांनीही पुढाकार घेतल्याचे दिसून आले नाही. केवळ नितेश राणे व हिंदुत्ववादी विषय असल्याने बरेच जण या सभेच्या वेळी उपस्थित असल्याचे दिसून आले. पण अपेक्षित असा पुढाकार पदाधिकाऱ्यांच्या वतीने कोणीही घेतला नाही असे चित्र होते.