तालुक्याच्या राजकारणात दिग्गजांना मित्र पक्षांची साथ मिळेल का ?
करमाळा समाचार
तालुक्यातील राजकारणात वेगवान घडामोडी घडताना आता सर्व चित्र स्पष्ट झाले असून महाविकास आघाडी महायुती व अपक्ष अशी लढत होताना दिसणार आहे. प्रमुख पक्षांमध्ये सर्व काही अलबेल आहे असे दिसत असले तरी पदाधिकारी मात्र वेगळ्या भूमिका मांडताना दिसून आले आहेत. आता चित्र स्पष्ट झाल्यानंतर त्यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विशेष करून महायुतीमध्ये मित्रपक्ष सोबत येतील का हीच मोठी शंका व्यक्त केली जात आहे.
आमदार संजयमामा शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढवलेली असली तरी ते अजित पवार यांच्याशी संबंधित होते व त्यांना आपला नेता मानत असल्याने त्यांच्याकडून विविध कामांसाठी पाठपुरावा करून निधीही त्यांनी उपलब्ध करून आणला होता. तर अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादीची कार्यकारणी निवडतानाही संजय मामा शिंदे यांचे मत विचारात घेण्यात आले होते. त्या पद्धतीने मामांच्या निकटवर्तीय पदाधिकारी या संघटनेत असल्याचेही दिसून येते. त्यामुळे आता महायुतीला जागा सुटल्यानंतर तालुका अध्यक्ष भरत आवताडे व त्यांचे पदाधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.
याशिवाय करमाळ्यातील जागा भाजपाला सोडावी यासाठी आग्रही असलेले गणेश चिवटे व जगदीश आगरवाल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन रश्मी बागल यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. तर आता रश्मी बागल यांच्याच बंधूंना महायुतीतून उमेदवारी मिळाली आहे. यामुळे मित्रपक्ष असलेल्या भाजपा कोणती भूमिका घेतो हे अद्याप स्पष्ट झाले नाही. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मात्र रात्रीच आपली भूमिका स्पष्ट करीत बागल यांना सहकार्य करण्याचे स्पष्ट केले आहे.
अशीच काहीशी परिस्थिती महाविकास आघाडी मध्ये ही दिसून येते काँग्रेसचे प्रताप जगताप, शिवसेना ठाकरे गटाचे शाहू फरतडे, सुधाकर लावंड व राष्ट्रवादीचे (शप) हनुमंत मांढरे, शिवराज जगताप ही मंडळी अद्याप उघडपणे मैदानात उतरलेले दिसून येत नाही. तर नाराजी व्यक्त करताना दिसून आलेले आहेत. त्यामुळे मित्रपक्ष म्हणून व शरद चंद्र पवार गटातीलच नाराज कार्यकर्ते सोबत घेण्याच माजी आमदार नारायण पाटील यांना आव्हान असणार आहे. नुकतेच संबंधित जागेसाठी आग्रही असणारे संतोष वारे यांनी आबांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर करत प्रचाराला सुरुवात केली. शिवाय बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनीही मागील वाद विसरून आबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.