शिंदेंची शिवसेना तालुक्यात एकाकी ; एका पाठोपाठ एक मित्रपक्ष सोडत आहेत साथ ?
करमाळा समाचार
महायुतीच्या माध्यमातून उभा असलेल्या एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या दिग्विजय बागल यांना मोठा झटका बसला असून भाजपाच्या जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे समर्थकांनी संजय मामा शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे यासंदर्भात उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरुवातीला राष्ट्रवादी अजित पवार गट तर आता भाजपा गणेश चिवटे गट हा बागलां पासून लांब गेल्याने एकनाथ शिंदे शिवसेना एकाकी पडलेला दिसून येत आहे. तर भाजपामधील काही कार्यकर्ते युती धर्म पाळत असल्याचे दाखवून देऊ शकतात. पण एक गट उघडपणे विरोधात गेल्याने बागलांना हा मोठा झटका मानला जात आहे.
करमाळा तालुक्याच्या राजकारणात रोज नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे माजी आमदार जयवंतराव जगताप, सावंत गट यांनी मामांची साथ सोडली व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नारायण पाटील यांना पाठिंबा दिल्यानंतर आता भाजपाचा एक गट संजय मामा शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देत आहे. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर उलथापालत होताना दिसत आहे. आजच सावंत यांनी अधिकृत पाठिंबा देत आपल्या सोबत इतर पदाधिकारी नेले. तर चिवटे यांच्या समर्थकांनीही जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. यावेळी स्वतः गणेश चिवटे हे ही या ठिकाणी उपस्थित असल्याचे दिसत आहे.
सुरुवातीला गणेश चिवटे यांनीही भाजपाकडे उमेदवारीची मागणी केली होती. पण ऐनवेळी सदरची जागा शिवसेनेला सोडून बागल यांना उमेदवारी देण्यात आली. पण बागल यांना उमेदवारी देण्यापूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गट संजयमामा सोबत गेला होता. तर आता भाजपाचे पदाधिकारी जाऊन मिळाल्याने या ठिकाणी महायुतीमध्ये मोठा गडबड घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याचा प्रभाव कशा पद्धतीने निवडणुकांवर पडेल येणारा काळ ठरवेल. सध्यातरी चिवटे समर्थकांनी बैठकीनंतर स्टेटस व समाजमाध्यमातुन भुमिका स्पष्ट केलीय. उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.