करमाळ्यात धनुष्यबाणामुळे बागल गटाला उभारी – मुख्यमंत्री शिंदे यांची सभा टर्निंग पॉईंट
महेश चिवटे ठरले गेम चेंजर!
करमाळा प्रतिनिधी
करमाळा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होवू लागली असतानाच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असणारे दिग्विजय बागल हे फ्रंट फुटवर आले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या काही वर्षापासून राजकीय सत्तेपासून दूर असलेल्या बागल गटात उत्साहाचे वातावरण दिसत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताकद दिल्याच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण हाती घेणाऱ्या बागल गटाला नवी उभारी आल्याचे जाणवत आहे.
महायुतीत करमाळ्याची जागा कोणाला, हा विषय चांगलाच तापला होता. विद्यमान आमदार हे राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार समर्थक असल्यामुळे हा मतदार संघ अजितदादा पवार यांच्याकडे जाणार असे निश्चित होते. मात्र विद्यमान आमदारांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचे ठरविले. आणि या जागेबाबत स्पर्धा रंगली. त्यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी फिल्डिंग लावून हा मतदारसंघ शिवसेनेकडे ठेवण्यात यश मिळविले. यावेळी उमेदवारसाठी स्वतः इच्छुक असतानाही स्वतः दोन पावले मागे घेऊन दिग्विजय बागल यांना उमेदवारी मिळण्यासाठी चिवटे आग्रही राहिल्याचे दिसून आले. त्यांची ही भुमिका करमाळा तालुक्यातील राजकारणात गेम चेंजर म्हणून पुढे आली आहे.
जागा वाटपाचा तिढा वाढत असताना चिवटे यांनी करमाळा मतदारसंघ शिवसेनेकडेच ठेवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. त्यावेळी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातही चर्चा झाली. अखेर वाटाघाटी होऊन शिवसेनेची उमेदवारी माजी मंत्री दिगंबरराव बागल यांचे पुत्र तर भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांचे बंधू दिग्विजय बागल यांना देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
दरम्यान बागल गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्यानंतर गटात उत्साह दिसू लागला आहे. बागल गटाचा जनाधार, शिवसेनेची ताकद आणि शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी गेली पाच वर्षात केलेली कामे यामुळे दिग्विजय बागल यांची उमेदवारी प्रभावी ठरु लागली आहे. सुरुवातीला करमाळ्याची लढत संजयमामा शिंदे व नारायण पाटील या आजी माजी आमदारात होईल अशी राजकीय चर्चा होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची करमाळ्यात सभा झाली आणि शिंदे यांनी बागल यांच्या पाठीशी आपण आहोत असे सांगितल्यानंतर बागल स्पर्धेत आले आहेत.
करमाळा विधानसभा शिवसेनेचे प्रचार प्रमुख म्हणून महेश चिवटे काम पाहत असून त्यांनी बागल यांच्या विजयाचा गुलाल वर्षावर घेऊन जाणार आहोत. अशी खात्री व्यक्त केली आहे.