मृत्युचे गुन्ह्याचे तपासाबाबत करमाळा पोलीसांवर ताषेरे
करमाळा समाचार
अरबाज महंमद पठाण, रा. केडगांव, ता. करमाळा, जि. सोलापूर यांचे मृत्युप्रकरणी करमाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिष्टर नंबर ३५२/२०२४ अन्वये अपघाताचा गुन्हा दाखल झालेला होता. मयत अरबाज पठाण यांचे आई वडिलांचे व ग्रामस्थांचे संशयावरून अरबाज पठाण यांचा अपघात नसून घातपाती मृत्यु झालेला आहे. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी करमाळा तहसिल व पोलीस स्टेशन कार्यालयावर निषेध मोर्चे काढलेले होते. तसेच वेळोवेळी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे सखोल तपासाबाबत मागणी केली होती. परंतु पोलीसांनी यावर कुठलीही दखल घेतली नव्हती.
याकारणास्तव महंमद गफूर पठाण यांनी अरबाज पठाण यांचे घातपातीबाबत सखोल तपासाकामी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने चौकशी करून सुनावणीवेळी करमाळा पोलीस स्टेशनचे ए. पी. आय. शिंदे साहेब यांना सदर गुन्ह्याबाबत सि. डी. आर., सी.सी. टीव्ही फुटेज व अन्य पुरावे असताना देखील चौकशी न केल्याने खडेबोल सुनावले व अरबाज पठाण यांच्या मृत्युबाबत पुन्हा एकदा सखोल चौकशी करून सी.सी. टीव्ही फुटेज, सी. डी. आर फुटेज व अन्य पुरावे गोळा करून ३० दिवसांमध्ये अहवाल सादर करणेबाबत जिल्हा पोलीस प्रमुख सोलापूर (ग्रामीण) व करमाळा पोलीस निरीक्षक साो. यांना आदेश दिलेले आहेत.
सदर गुन्ह्याचे तपासाचे अहवालासह करमाळा पोलीस व मा. जिल्हा पोलीस प्रमुख सोलापूर (ग्रामीण) यांना मुंबई उच्च न्यायालयात समक्ष हजर राहणेबाबत आदेशीत केलेले आहे. सदर याचिका महमंद गफूर पठाण यांचे वतीने अॅड. सचिन देवकर मुंबई व अॅड. अलिम हामजेखान पठाण करमाळा यांनी केलेले आहे.