करमाळ्याला बार्शी सारख्या नेत्यांची गरज ; सामान्य जनता हवालदिल
करमाळा समाचार
काही दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यात नवीन बस दाखल झाल्या तर त्या पाठोपाठ सोलापूर जिल्ह्यातही बार्शी येथे नवीन बस दाखल झाल्या. त्या बस वरून दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेय वादावरून लढाई आहे पण त्यांच्या नेत्यांनी करुन दाखवले. पण मागील वर्षभरापासून करमाळा तालुक्यातील युवकांनी समाज माध्यमाच्या माध्यमातून तर नेत्यांपर्यंत पत्र व इतर आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करत असताना अद्यापही एसटी का नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुळातच मागील २०१९ पासून करमाळा आगारासाठी नवीन बस आलेल्या नाहीत. जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केले जाते. त्यासाठी येथील सोशिक जनता सर्वकाही सहन करते म्हणून आजपर्यंत त्याकडे दुर्लक्ष केले जाते आहे. तर तालुक्यातील नेत्यांचे वरिष्ठ नेत्यांजवळ अपेक्षित असे वजन नसल्याचे ही चर्चा आहेत.

बार्शी येथे केवळ नेत्यांच्या पत्रांवर दहा एसटी आल्या. जेव्हापासून त्या भागात एसटी आल्या आहेत तेव्हापासून करमाळा तालुक्यात मात्र सर्वत्र एवढ्या मागण्या व समाज माध्यमातून झालेल्या चर्चा या सर्वांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते असे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात सर्वात मोठी जागा उपलब्ध असलेले हे बस स्थानक केवळ बिघडलेल्या गाड्यांसाठी सध्या प्रसिद्ध आहे. केवळ तासाभरासाठी त्या ठिकाणी जाऊन थांबल्यास कमीत कमी चार ते पाच गाड्या या बंद अवस्थेत किंवा बंद पडल्या म्हणून माघारी आलेल्या असतात. तरीही नवीन गाड्या मिळत नसतील तर यापेक्षा मोठे दुर्दैव काय असेल.
तालुक्यातील सामान्य कार्यकर्त्यापासून नेत्यांच्या मोठ्या अधिकारी तसेच मंत्र्यांसोबत उठत बैठक चालू असते. पण या बस आणण्यासाठी होताना दिसत नाही. चुकून हुकून तालुक्याला बस मिळाल्या तरीही माझ्या पत्रामुळे मिळाल्या किंवा आम्ही लक्ष घातले म्हणून मिळाल्या असे सांगणारे मात्र तेव्हा मागे राहणार नाहीत. कायम फक्त श्रेयवादासाठी लढणारे एकत्र येऊन तालुक्यासाठी बस सांगतील का हा मोठा प्रश्न आहे ?