आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पक्षीय जांगडगुत्ता ; कार्यकर्त्यात संभ्रमावस्था
करमाळा समाचार – विशाल (नाना) घोलप
तालुकावासियांच्या अस्मितेचा विषय असलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पक्षीय जांगडगुत्ता झालेला दिसून येत आहे. सहकारी संस्थेचे निवडणूक असल्याने केवळ नावालाच पक्षाची नावे वापरली जात आहेत. वास्तविक पाहता यामध्ये महायुती तसेच महाविकास आघाडीच्या कोणताही संबंध दिसून येत नसल्याचे दिसते आहे. एकीकडे महाविकास आघाडीकडे महायुतीचे नेते तर महायुतीच्या पॅनल कडे महाआघाडीचे नेते संपर्कात असल्याचे दिसत आहे.

तालुक्याचे राजकारण कायमच गटातटावर अवलंबून राहिलेला आहे. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांच्या निवडणुका या ठिकाणी गटावरच अवलंबून असतात. पण मागील काही काळापासून तालुक्याच्या राजकारणात पक्षीय राजकारणांनी प्रवेश केला व प्रत्येकच गट आपण कोणत्या ना कोणत्या गटाचे असल्याचे सांगून संपर्कात जाऊ लागला. यातच काही काळापूर्वी अपक्ष असलेले माजी आमदार संजयमामा शिंदे हेही आता महायुतीच्या गोटात सामील झाल्याचे दिसून येत आहेत.

विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून संजीवनी पॅनलची उभारणी केली खरी पण यामध्ये जामखेडचे माजी आमदार तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे निकटवर्तीय कार्यकर्त्यांचा उमेदवार म्हणून सहभाग असल्याचे दिसून येत आहेत. तर निवडणुकीत हजार बाराशे मतदार हे जामखेड तालुक्यातील असतानाही त्या भागातील आमदार रोहित पवार यांच्या ऐवजी जेष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या प्रतिमा वापरल्या जात आहेत.
तर महायुतीच्या पॅनल मधून माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उभा असलेल्या पॅनल मध्ये कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची निकटवर्तीय असलेले बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे हे सक्रिय असल्याचे दिसून येतात. याशिवाय उघडपणे रोहित पवारांची प्रतिमा फलकांवर वापरली जात आहे. यामुळे जरी राम शिंदे यांचं उघडपणे नाव कुठेही येत नसले तरी ते महाविकास आघाडीच्या नारायण पाटील यांच्यासोबत तर रोहित पवार हे महायुतीच्या पॅनल सोबत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नेमका कोणत्या पक्षाचा कोणता पॅनल आहे यात संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे.
पक्षाचा संबंध नसल्याने बागल अलिप्त ….
तालुक्याचे राजकारण गटातटाचे राहिले आहे. त्यामुळे बागल हे स्वतंत्र गट असून त्यांनी आपली भूमिका जाहीर करत निवडणुकांमधून माघार घेतली आहे. तर निवडणूक होत असलेले गटांनी जरी महाविकास आघाडी व महायुती नावे दिली असली तरी त्यांच्या अंतर्गत पाठिंबा हा वैयक्तिक स्वरूपाचे असल्याचे दिसून येतात. त्यामुळे बागलांवर आजही कोणत्याही प्रकारचा दबाव असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे बागल हे स्वतंत्र अस्तित्व टिकून सदरच्या निवडणुकीतून अलिप्त राहण्याची भूमिकेत आजही दिसत आहेत. याशिवाय येणाऱ्या काळात ते कोणाला सहकार्य करतील हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी स्थानिक पातळीवर झालेल्या गोंधळामुळे वरिष्ठ पातळीवरूनही त्यांना सूचना मिळणे कठीणच दिसून येत आहे.