अगरवाल मारहाण प्रकरणात सहा जण ताब्यात ; सात दिवसांची पोलिस कोठडी
करमाळा समाचार
भाजपाचे शहराध्यक्ष जगदिश अगरवाल यांना सोमवारी इंदापूर येथील म्होरक्या असलेल्या गुंडांकडून करमाळ्यात मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर एकूण नऊ जणांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना आज करमाळा न्यायालयात हजर केल्यानंतर सात दिवसांची (दि २१) पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यामध्ये इंदापूर तालुक्यातील सराटी येथील देवा कोकाटे यासह सहा आरोपीचा सहभाग आहे.

काही दिवसांपूर्वी पोलीस ठाणे परिसरात झालेल्या शुल्लक वादाचे कारण समोर करीत देवा कोकाटे व साथीदारांनी जगदीश अग्रवाल यांच्यावर त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन हल्ला केला होता. अगरवाल यांच्या हाताच्या मनगटावर जबर मार लागल्याने हाताचे हाड फॅक्चर झाले आहे. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथे नेण्यात आले आहे. दरम्यान हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात, पायावर व सर्व अंगावर लाकडी दांडके व कोयता याने मारहाण केल्याने अग्रवाल हे गंभीर जखमी झाले आहेत.

तर करमाळा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत यातील सहा आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना आज न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांच्यासोबत असलेले इतर कार्यकर्ते, गाड्या व हत्यार शोधण्याकामी सात दिवसांची पोलीस कोठडी पोलिसांच्या वतीने मागण्यात आली होती. यावेळी करमाळा येथील न्याय दंडाधिकारी यांनी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अटकेतील आरोपींची नावे …
देवानंद नवलचंद कोकाटे (वय 42, रा. सराटी, ता. इंदापूर, जि. पुणे), महेश सुग्रीव वगरे (वय २७, रा. वाघेचीवाडी, पाटील वस्ती, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर), ओंकार सुरेश मगर, (वय 37, रा. निमगाव म, ता. माळशिरस, जि. सोलापूर), सचिन पांडुरंग टकले (वय 30, रा. अरणनगर, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर, विलास लक्ष्मण काटकर (वय 31, रा. आनंदनगर, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) व स्वप्निल संपतराव माने देशमुख (वय 32) अशी अटक संशयिताची नावे आहेत.