संजयमामा शिंदेंचे खंदे समर्थक गायकवाड यांना दिलासा
करमाळा समाचार
देवळाली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व माजी आमदार संजय मामा शिंदे गटाचे कार्यकर्ते आशिष गायकवाड यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अपात्रतेचा दावा अखेर कोल्हापूर खंडपीठात फेटाळण्यात आला आहे. या निर्णयामुळे गायकवाड यांना मोठा दिलासा मिळाला असून, ग्रामपंचायतीतील त्यांच्या पात्रतेचा निर्णय कायम राहिला आहे.

ही संपूर्ण प्रक्रिया मागील काही महिन्यांपासून सुरु होती. सुधीर आवटे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे आशिष गायकवाड यांच्याविरुद्ध ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र ठरविण्याबाबत अर्ज दाखल केला होता. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निकालानंतर गायकवाड यांनी त्या निर्णयाविरोधात कमिशनर, पुणे विभाग यांच्याकडे अपील दाखल केले होते. सदर अपील कमिशनर यांनी मंजूर करत, गायकवाड पात्र असल्याचे घोषित केले होते.
त्यानंतर सुधीर आवटे यांनी या निर्णयाविरोधात हायकोर्ट, खंडपीठ कोल्हापूर येथे रिट पिटीशन दाखल केले होते. मात्र न्यायालयाने संपूर्ण बाबींची सविस्तर छाननी केल्यानंतर आशिष गायकवाड यांच्या बाजूने निकाल देत, आवटे यांचे रिट पिटीशन फेटाळून लावले.

या प्रकरणात ॲड. अजिंक्य गायकवाड व ॲड. ऋत्विक गाडगे यांनी आशिष गायकवाड यांचे कायदेशीर प्रतिनिधीत्व करत प्रभावी युक्तिवाद सादर केला. न्यायालयाच्या निर्णयामुळे देवळाली ग्रामपंचायतीतील गायकवाड यांचे राजकीय स्थान आणखी मजबूत झाले आहे.
