पळुन आलेली साताऱ्याची अल्पवयीन मुलगी व जामखेडचा युवक करमाळ्यात ताब्यात ; पोलिस पाटील शिंदे यांची कामगिरी
करमाळा समाचार
सातारा जिल्ह्यातील अल्पवयीन मुली सोबत प्रेम संबंध करीत तिला पळून घेऊन येणाऱ्या जामखेडच्या युवकाला करमाळ्यात पकडण्यात यश आले आहे. सातारा पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार पोथऱ्याचे पोलीस पाटील संदीप शिंदे यांनी सदरची कामगिरी करताना मोठ्या शिताफीने पाठलाग करुन संबंधित दोघांना ताब्यात घेतले. त्या नंतर दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या कामगिरी बद्दल शिंदे यांचा करमाळ्याचे पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे व साताराचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अभिजीत चौधरी यांनी कौतुक केले आहे.

जामखेडचा युवक महेश जगताप गुरेवाडी, तालुका जामखेड याचे कुंभारगाव तालुका पाटण जिल्हा सातारा येथील सतरा वर्षीय अल्पवयीन मुली सोबत प्रेम संबंध जडले होते. दोघांनीही घरच्यांचा विरोध डावलून पळून जाण्याचे ठरवलं. तो तिला घेऊन करमाळा तालुक्यात येऊन वास्तव्य करत होता. याबाबतची माहिती सातारा पोलिसांना मिळाली. त्यावरून त्यांनी पोथरे येथील पोलीस पाटील शिंदे यांच्याशी संपर्क साधला.

संदीप पाटील यांना मिळालेल्या एका फोटो वरून आणि काही ठिकाणांची माहिती मिळाली. त्या ठिकाणी तपासणी घेतली असता त्या ठिकाणी ते मिळून आले नाही. त्यानंतर पाटील यांना सदर दोघेही करमाळ्याच्या दिशेने गेले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी करमाळा नगर रोड येथील बायपास रस्त्यावर जय हिंद हॉटेल शेजारी सदरच्या दोघांना ताब्यात घेतले व करमाळा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.