अण्णाभाऊंसारखा साहित्यिक पुन्हा होणे नाही…
करमाळा समाचार
साहित्यरत्न अण्णा भाऊंचा जन्म मातंग जातीत १ ऑगस्ट १९२० रोजी सांगलीतील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव सिद्धोजी साठे, तर आईचे नाव वालूबाई साठे होते. मुंबईतील चिरागनगरीच्या झोपडपट्टीत अत्यंत हालाखीच्या अवस्थेत १८ जुलै १९६९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णा भाऊ साठे यांनी ३५ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्य, ११ पोवाडे, एक प्रवासवर्णन आणि शेकडो लावण्या, छकडी, गाणी लिहिली आहे. मराठी साहित्याला क्रांतीचा उर्जास्त्रोत देणारे लोकशाहीर म्हणून ते सुपरिचित आहेत. ‘माणूस’ हा त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू आहे. त्यांचे साहित्य हे तत्कालीन काळातील वास्तव जीवनाचे अपत्य आहे.
त्यांच्या साहित्यातून त्यांनी वंचित आणि उपेक्षित समाजाच्या तळागाळातील जातीजमाती, सवर्ण आणि दलित माणसांचे जीवन मांडले आहे. त्याला वास्तवतेची धार आहे. त्यांचे साहित्य बंड, क्रांती आणि विद्रोहाची विचारशलाका आहे. त्यांच्या साहित्यात स्वातंत्र्याचे पंख लावून भरारी मारावयाच्या जगण्याचे तत्त्वज्ञान आहे. ‘ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे,’ अशी विज्ञानवादी भूमिका त्यांनी मांडली आहे. मात्र, तरीही या साहित्यिकांची नेहमीच उपेक्षा झाली आहे. भांडवलशाही, मुंबईतील विषमता यांच्या विरोधात त्यांनी रणशिंग फुंकले आहे.
त्यांचा वाटेगाव ते मुंबई हा प्रवास अतिशय वेदनादायी आहे. साम्यवादी विचाराने अण्णा भाऊ भारावलेले होते. मुंबईत लाल बावटा कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचा प्रचार केला. शाहीर अमर शेख, द. ना. गव्हाणकर, कॉ. डांगे यांच्याप्रमाणे मार्क्सवादी चळवळ व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी माणसे जोडली. पुरोगामी विचारांचा अखंड महाराष्ट्र घडवून जगात महाराष्ट्राचे नाव कोरले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दलितांच्या गुलामगिरीच्या विरोधात आवाज उठवला.
अण्णाभाऊमुळे तमाशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. तमाशाचा ढाचा बदलला. पूर्वीचे पारंपरिक अध्यात्म, पौराणिकता, आख्यानवजा स्वरूप बदलले. माणसाचं माणूसपण जपणारा साहित्यिक, सतत चळवळीत असणारा असा चळवळ जगलेला शाहीर म्हणून त्यांचे नावलौकिक आहे. त्यांच्या साहित्यात विद्रोहाची आग, धग आहे. जनतेची कदर करणारा कलावंत आहे. त्यांचे साहित्य वैचारिक असून, त्याला परंपरेच्या विरोधात परिवर्तनाची आणि सत्यशोधकी विचारांची धार आहे. बहुजन चळवळीचे नायक आहेत. अण्णा भाऊ ‘दलित कथेचे शिल्पकार’ आणि ‘जय भीम, लाल सलाम’ संकल्पनेचे पुरस्कर्ते आहेत. ‘माझा रशियाचा प्रवास’मधून त्यांनी समाजवादाची भूमिका मांडली. या सर्वाचा विचार करता असा साहित्यिक पुन्हा होणे नाही हे बोलण्यास वावगे ठरणार नाही.
२०२० हे वर्ष अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष होते. ही जन्मशताब्दी मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली गेली.
२०२१ मध्येही या थोर मानवाची जयंती साजरी करीत असताना करोनाच्या काळात अण्णा भाऊंची व्यापक विचारधारा स्वीकारून समाजोपयोगी कामे केली पाहिजेत. वर्गणीतील जमवलेले पैसे समाजाच्या कल्याणासाठी खर्च केला पाहिजे. त्यांचे विचार मराठी माणसात रुजवून त्यांच्या विचारांचा जागर केला पाहिजे. समाजाला विधायक वळण देण्याच्या कामासाठी पुढे पाऊल टाकले पाहिजे. हीच त्यांच्या विचारांची फलश्रुती ठरेल. अण्णा भाऊंच्या संघर्षाची जीवनगाथा हृदयस्पर्शी आहे. दु:ख, दैन्य आणि दारिद्र्याच्या साखळदंडात सापडूनही अण्णांनी विपुल अशी साहित्यसंपदा निर्माण केली. त्यांचे साहित्य भारतासह रशिया, झेक, पोलंड, जर्मन अशा २७ भाषेत भाषांतरित झाले आहे. या साहित्यप्रतिभेच्या महामेरूला सरकारने ‘भारतरत्न’ घोषित करावे आणि ज्ञानपीठ पुरस्कारही द्यावा. जयंतीनिमित्त अण्णाभाऊ चरणी कोटी कोटी प्रणाम..
-युवराज नामदेव जगताप
मातंग समाज युवा नेते
अध्यक्ष मातंग एकता आंदोलन