पावसाळयाच्या पुर्वतयारीत प्रशासन ढिम्म ; रस्त्यांची दुरावस्था
करमाळा समाचार -संजय साखरे
करमाळा तालुक्यातील राजुरी ते पोंधवडी या रस्त्याची अवस्था अतिशय भयानक झाली असून या रस्त्याने पायी चालणे अवघड झाले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील राजुरी सह वाशिंबे, उंदरगाव या गावांना तालुक्याच्या ठिकाणाला जाण्यासाठी हा पर्यायी रस्ता आहे. सतत पडणाऱ्या पावसाने रस्त्यावर पाणी साचले असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल झाला असल्याने वाहनधारकांना वाहन चालवणे ही कठीण झाले आहे.

जिओ कंपनीने खोदलेल्या केबल चारीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर माती साचली असून रस्त्यावरील डांबर पूर्णपणे निघून गेले आहे. याशिवाय या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या शेतकऱ्यांनीही रस्ता मोठ्या प्रमाणावर कोरला असून फक्त या मार्गावरून एकेरी वाहतूक चालू आहे. या रस्त्यावरून करमाळा ते राजुरी ही एसटी बस चालू असून यामधून राजुरी वरून अनेक विद्यार्थी वीट व करमाळा या ठिकाणी शिक्षणासाठी जातात. जिओ केबलच्या संदर्भात गावातील नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने जिओ कडून या रस्त्याचा मोबदला घेतला असून त्याचा त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आपण निवेदन दिले असून रस्त्याची लवकर दुरुस्ती न झाल्यास या भागातील नागरिक व विद्यार्थी यांच्यासह आंदोलन केले जाणार आहे.
– नंदकुमार जगताप, सामाजिक कार्यकर्ते, राजुरी
राजुरी ते पोंधवडी या ग्रामीण रस्त्याचे पाऊस संपताच मुरुमीकरण व रोलिंग करण्यात येणार आहे.
कुंडलिक उबाळे,
अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग