गुळसडीतील प्राथमिक शिक्षिकांचे कौतुकास्पद योगदान; कोरोना प्रतिबंधासाठी गावात केली जनजागृती
करमाळा समाचार
कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी कोरोना विषयक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, कोरोना लसीकरणासाठी पात्र नागरिकांनी सकारात्मकता दाखवावी. यासाठी गुळसडी (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत तिन्ही शिक्षिकांनी गावामध्ये कोरोना प्रतिबंधक जनजागृती करण्यावर भर दिला आहे.

गुळसडी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका ज्योती राऊत, सहशिक्षिका मंजुषा आव्हाड, संगीता बीडगर या तीन महिला कार्यरत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने त्यांनी कोरोना संदर्भात जागृती करण्यावर भर दिला आहे. त्या अनुषंगानेच त्यांनी माझे गाव कोरोनामुक्त गाव, माझे दुकान माझी जबाबदारी याबाबत प्रबोधनात्मक उपक्रम राबविले आहेत.

गावातील वेगवेगळे दुकानदार, पिठाची गिरणी चालक, भाजी विक्रेते यासह सामुदायिक संपर्क येवू शकणाऱ्या ठिकाणी तसेच नागरिकांना कोरोना रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, कोरोना लसीकरण याबाबत जागृती पत्रके वाटून, पोस्टर चिकटवून राऊत, आव्हाड, बीडगर या शिक्षिकांकडून जनजागृती केली गेली आहे.
विक्रेते, नागरिकांना मास्क वापरा, वारंवार हात धुवा, दोघात अंतर ठेवा. अशा प्रकारचे आवाहन करत त्यासाठी जागृती केली जात आहे. गावातून प्रत्यक्ष फेरीद्वारे कोरोना विषयक प्रबोधन करतानाच ई-पत्रके तयार करुन व्हॉट्स अपच्या माध्यमातून कोरोनाविषयक काळजी घेण्याचे आवाहन शिक्षिकांकडून केले जात आहे.
या उपक्रमांचे सरपंच संजीवनी यादव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महावीर कळसे तसेच ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.