ग्रामपंचायतीच्या कामात ९६ लाखांचा अपहार केल्याचा ठपका ; ग्रामसेवक व सरपंचावर गुन्हा दाखल
करमाळा समाचार
देवळाली तालुका करमाळा येथील ग्रामपंचायत मध्ये २०१२ ते २०१५ तत्कालीन ग्रामविकास अधिकारी अंगद लटके व तत्कालीन सरपंच प्रेमा जगताप यांच्यावर गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात माजी सभापती गहीनाथ ननवरे यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन उपोषणाचा मार्ग अवलंबला त्यानंतर सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, २४ फेब्रुवारी २०१२ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीमध्ये देवळाली ग्रामपंचायत या ठिकाणी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी अंगद लटके व तत्कालीन सरपंच प्रेमा जगताप यांनी संगणमत करून आर्थिक गैरव्यवहार केला अशी तक्रार गहीनाथ ननावरे यांनी २०१७ मध्ये दिली होती. सदर प्रकरणात ९६ लाख ६५ हजार ८५८ रुपयाचा अपहार झाल्याची तक्रार यावेळी करण्यात आली होती. तक्रारीनंतर सदर प्रकरणाची चौकशी सुरू झाली. दरम्यानच्या काळात समितीने पंचायत समिती करमाळा यांच्याकडे अहवाल सादर केला. त्यामध्ये लटके व जगताप यांच्याकडून ९७ लाख ३८ हजार ९०८ वसूल पात्र होत असल्याचा अहवाल दिला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तत्कालीन सरपंच जगताप यांना कारणे दाखवा नोटीस दिली. त्यांनी विहित वेळेवर कोणताही खुलासा सादर केला नाही.

तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांनी देवळाली ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी लटके यांना सदर कालावधीमध्ये देवळाली ग्रामपंचायत मधील दरपत्रक शिवाय साहित्य खरेदी करणे, पाणीपुरवठा उप प्रमानका शिवाय व हजेरी पत्रकाशिवाय खरेदी करून खर्च करणे, ग्रामनिधी मूल्यांकन विविध प्रक्रिया न राबवता खर्च करणे, पाणीपुरवठा निधी मूल्यांकन व दरपत्रक व निविदा प्रक्रिया न राबवणे, लेख संहिता भंग करणे, सचिव या पदाची कर्तव्य पार पाडण्यास कसूर करणे, महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक १९६७ मध्ये नियम भंग करणे असे आरोप करण्यात आले होते. यापैकी आरोप क्रमांक चार सिद्ध होत नसल्याने अपहार मधून तेवढी रक्कम वजा करण्यात आली. त्यानुसार ९६ लाख ६५ हजार ८५८ रुपयांचा गुन्हा दाखल यावा अशा सूचना करण्यात आल्या.
दरम्यान माजी सभापती गहीनाथ ननवरे यांनी वेळोवेळी सदर प्रकरणाची तक्रारी करूनही यामध्ये गुन्हा दाखल करण्यात येत नव्हता. त्यामुळे अखेर गहीनीनाथ ननवरे हे एक मे रोजी सोलापूर येथे उपोषणासाठी बसले होते. त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुंह्याची तक्रार विस्तार अधिकारी अविनाश थोरात यांनी दिली आहे.