टाळ-मृदंगाच्या गजरात अन् हरिनामाच्या जयघोषात वरात ; अनोखे शुभमंगल
करमाळा समाचार
लग्न म्हटले की, डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई घोड्यावर निघालेली वरात अन् फटाक्याची आतषबाजी असे चित्र सर्रास दिसते. मात्र करमाळा तालुक्यातील हिवरवाडी येथे टाळ-मृदंगाच्या गजरात अन् हरिनामाच्या जयघोषात वरात निघाली अन् शुभमंगल सावधानही झाले. वारकरी सांप्रदायिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. संपूर्ण गावातील वातावरण भक्तिमय होते. तालुक्यात पहिल्यांदाच पवार कुटुंबीयांकडून वारकरी सांप्रदायाप्रमाणे विवाह सोहळा पार पडला.

या वेळी आळंदी, पंढरपूर, नाशिक, संभाजीनगर, पुणे, धाराशिव जिल्ह्यातून महाराज मंडळी व संबंधित क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. हिवरवाडीतील कुटुंबाने एक नवा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. हिवरवाडीतील मधुकर कोंडिबा पवार यांचे सुपुत्र लखन महाराज पवार यांचा विवाह बारामती तालुक्यातील ऋऋतुजा मेरगळ यांच्याशी ९ मे रोजी संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी सोहळा संपन्न झाला.

विवाहानिमित्त गावातून दिंडी सोहळा काढण्यात आला. यात तालुक्यातील ३५ गावासह महाराष्ट्रातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या विवाह सोहळ्यासाठी आळंदी, पंढरपूर, करमाळा तालुका व तसेच नाशिक, संभाजीनगर, पुणे, घाराशिव जिल्ह्यातून सर्व महाराज मंडळी व वि मंडळी व विविध विविध क्षेत्रातील अधिकारी उपस्थित होते. नवरा-नवरीच्या वरातीवेळी टाळ-मृदंगाच्या गजरात गावातून दिंडी काढण्यात आली.
लहान अन् ज्येष्ठ सर्वांनीच लुटला आनंद..
दिंडी सोहळ्यात गोल रिंगण, फुगडी आणि पाऊल खेळत लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी आनंद लुटला. साधारणतः एखाद्या लग्नात मोठ्या आवाजाचा डॉल्बी लावला जातो व त्यावर नाच गाणे करत वाद-विवाद व वेळेची बंधने तोडून सदरची विवाह संपन्न केली जातात. पण लखन महाराज पवार यांनी एक अनोखा व पारंपारिक पद्धतीचा सांप्रदायिक विवाह केल्याने आकर्षणाचा विषय ठरत आहे.
माझे शिक्षण आळंदीत झाले त्यामुळे असा विवाह सोहळा…
माझे शिक्षण आळंदी येथे झाले आहे. आमच्या शाळेतील सर्वच विद्यार्थी जवळपास अशाच पद्धतीने विवाह करतात. याशिवाय माझ्या तालुक्यात असा पहिलाच विवाह संपन्न झाला. त्यातून इतरांनी आदर्श घ्यावा. त्यामुळे तालुक्यात पहिले लग्न सांप्रदायिक पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. त्याला वधू पक्षाकडूनही प्रतिसाद मिळाला. पूर्वी आमच्याच गावातील आमच्या भावकीतील एकाला डॉल्बीमुळे बहिरेपणा आला होता. परंतु अशा पद्धतीने विवाह संपन्न झाल्यास आपली परंपरा अखंडित चालू राहील व वादविवादही टळू शकतील. याशिवाय नाहक खर्चही वाचणार आहे.
– लखन पवार, नवरदेव, हिवरवाडी.