बारामती खून प्रकरणात दुसराही ताब्यात ; मुळच्या करमाळ्याच्या अधिकाऱ्याकडे तपासाची सुत्रे
करमाळा समाचार
बारामती येथे महाविद्यालयांमध्ये झालेल्या खुनाचा दुसरा संशयित बारामती पोलिसांनी ताब्यात घेतला असून दोघांनाही न्यायालयात उभा केले असता विधी संघर्ष बालक असल्यामुळे दोघांनाही न्यायालयाने ताब्यात घेतले आहे. त्या दोघांनी सोमवारी बारामतीची महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या करमाळा तालुक्यातील ओंकार पोळ याचा महाविद्यालयात धारदार शस्त्राने खुन केला होता असा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करमाळा तालुक्यातील जेऊर येथील ओंकार संतोष पोळ व संशयीत आरोपी एकत्रित बारावीचे शिक्षण बारामती येथील टीसी कॉलेजमध्ये घेत होते. तिघांचीही तुकडी वेगळी असली तरी महाविद्यालयात तिघांचा संपर्क होत होता. कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांच्यात वादही झाले होते. याशिवाय यापूर्वी गाडीवरून कट मारण्याच्या किरकोळ कारणातून झालेली वादावादी अखेर खुनापर्यंत जाऊन पोहोचली. सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास दप्तरामध्ये धारदार शस्त्र लपवून आणल्यानंतर दोघांनिर्मिती ओंकारवर हल्ला चढवला व काही कळण्याच्या आतच ओंकारच्या गळ्यावर तसेच अंगावर कोयता तसेच चाकूने वार करण्यात आले. यातच उपचारापूर्वी ओंकारचा मृत्यू झाला.

यावेळी करमाळा येथून कुटुंबीय बारामती येथे पोहोचल्यानंतर संबंधित आरोपींना तात्काळ ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली होती. यावेळी करमाळ्याचे जेऊर येथील सरपंच पृथ्वीराज पाटील व ओंकार पोळ यांचे कुटुंबीय बारामती पोलीस ठाण्यासमोर ठाण मांडून होते. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समजूत घातली व शोध घेण्याचे आश्वासन दिले. यानंतर मृत शरीर ताब्यात घेतले व करमाळा तालुक्यातील जेऊर शेटफळ रस्त्यावरील शेतात सोमवारी रात्री आकराच्या सुमारास अंत्यविधी करण्यात आला. तर याप्रकरणी बारामती पोलिसांनी वेगवान तपास करीत फरार असलेल्या दुसऱ्या मुलाचाही शोध घेतला व त्या दोघांनाही पुणे येथील न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दोन्ही विधी संघर्ष बालक असल्याने त्यांना ताब्यात घेतले आहे. तर सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप भिताडे हे करीत आहेत. भिताडे हे करमाळा तालुक्यातील असल्याचे समजते आहे.