तुझ्या बापाच्या घरातून लस देणार आहेस का ? असे म्हणत आशा स्वयंसेविकेला शिवीगाळ
करमाळा समाचार
केत्तुर क्रमांक दोन येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आयोजित लसीकरण केंद्रावर जमलेल्या लोकांना रजिस्ट्रेशन बाबत विचारणा करीत असताना एकाने आशा स्वयंसेविकेला घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केल्याने त्याच्यावर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार दि २९ रोजी दुपारी तीन वाजता केतुर येथे घडला आहे.


संपतराव मारुती मोरे पाटील रा. केतुर क्रमांक २ यांच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याप्रकरणी आशा स्वयंसेविका रंजना तानाजी कनिचे (वय २७) यांनी तक्रार दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रंजना कनिचे या कोविड काळात लसीकरण व सर्वे या विषयांमध्ये काम करत आहेत. मागील कोविड काळात त्यांनी घरोघरी जाऊन सर्वे तसेच टेस्टिंग व लसीकरणात मोहिमेत सहभाग नोंदवला होता. त्याच पद्धतीने आता लसीकरणाचा शिबिर केतुर क्रमांक दोन येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित लोकांमध्ये रजिस्टेशन केले अथवा नाही याची विचारना रंजना कनिचे या करीत होत्या. याच दरम्यान त्या ठिकाणी त्यांच्या केतुर क्रमांक दोन या गावचे संपतराव मारुती मोरे पाटील हे आले. कनिचे यांनी मोरे यांनाही रजिस्टेशन बाबत विचारणा केली. त्यावेळी मोरे यांना घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच “तू मला विचारणार कोण ? , तुझ्या बापाच्या घरातून लस देणार आहेस का ? ” असे म्हणत शिवीगाळ सुरू ठेवली. यावेळी इतर स्टाफ ही त्या ठिकाणी उपस्थित होता. सदरचा प्रकार रंजना कनिचे यांनी आपल्या पतीस कळवल्यानंतर पतीसोबत येऊन त्यांनी करमाळा पोलीस ठाण्यात सदर प्रकार सांगून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.