शिंदे यांना विजयी करून मागासवर्गीय समाज किंगमेकर बनणार – कांबळे
करमाळा –
करमाळा माढा मतदार संघातून यंदाअतिशय चुरशीची लढत होत असून मागासवर्गीय समाजाने संविधानाच्या मुद्द्यावर भाजपला विरोध करत महाविकास आघाडीला मतदान केले. परंतु महाविकास आघाडीने नंतर मात्र राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केले तसेच सोलापूर जिल्ह्यात व महाराष्ट्रात आयात मागासवर्गीय उमेदवार राखीव जागावर दिले. तसेच चळवळीतल्या लोकांचा विचार केला नाही याचाच रोष म्हणून करमाळा तालुक्यात आपण एक प्रयोग करत असून महाविकास आघाडी व महायुती या दोन्हींना अद्दल घडवण्यासाठी त्यांना मतदान न करता अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांना मतदान करून ताकद दाखविणार असल्याचे नागेश कांबळे यांनी सांगितले.
नागेश कांबळे हे बहुजनवादी चळवळीतील मोठे नाव असून त्यांना मानणारा मोठा वर्ग या तालुक्यात आहे. नागेशदादा कांबळे यांच्या भूमिकेमुळे आधीच चुरशीची होत असलेली ही निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे. या तालुक्यात एकूण 25 ते 28 हजार मागासवर्गीय मतदार असून त्यापैकी किमान दहा हजार मतदार चळवळीच्या माध्यमातून जोडले गेलेले असून हे दहा हजार मतदानच करमाळा तालुक्याचा आमदार ठरवणार असून सगळे मोठे नेते महाविकास आघाडीकडे जात असताना आपले स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याची व किंगमेकर बनण्याची संधी असून अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना विजयी करून दलित समाज किंगमेकर बनणार आहे असे नागेश कांबळे यांनी सांगितले
यावेळी बोलताना संजयमामा शिंदे म्हणाले की नागेश कांबळे हे अतिशय तात्विक राजकारण व समाजकारण करतात मला अशाच लोकांची गरज आहे. नागेश कांबळे यांच्या चळवळीच्या कामात माझा कसलाही हस्तक्षेप होणार नसून त्यांच्या मुळे या उमेदवारीस अधिक बळ मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी दलित सेना, मातंग एकता आंदोलन, वैदू समाज,ख्रिश्चन समाज यांचे वतीने संजयमामा शिंदे यांना पाठिंबा देण्यात आला. यावेळी विवेक येवले, लक्ष्मणराव भोसले, कन्हैयालाल देवी यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन भिमराव कांबळे यांनी केले.