केळी कंपनीकडुन केळी व्यापाऱ्याची फसवणुक ; गुन्हा दाखल
करमाळा समाचार
केळी पुरवठा करूनही कंपनीने पैसे देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात टेंभुर्णी येथील कंपनीचे मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये वाशिंब्याच्या दोघांची फसवणूक संबंधित कंपनीने केले असून तब्बल ४० लाख रुपये दिले नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदरचा प्रकार नोव्हेंबर २०२४ मध्ये घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धनराज भोईटे व नबीलाल शेख हे दोघेही शेतकऱ्यांची केळी घेऊन कंपनीला पुरवठा करण्याचे काम करतात. सन २०२४ मध्ये भोईटे यांनी टेंभुर्णी येथील एमडी इंपोर्ट एक्स्पोर्ट या कंपनीसोबत केळी सप्लाय करण्याचा व्यवसाय सुरू केला. सदर कंपनीचे मालक अजिंक्य देशमुख यांच्या कंपनीला २४ लाख ३ हजार १५१ रुपये किमतीची केळी पुरवठा केली होती. केळी पुरवल्यानंतर कंपनीने भोईटे यांना पंधरा ते वीस दिवसात पैसे देणे आवश्यक होते.
परंतु त्यांनी केळी पुरवल्यानंतर बरेच दिवस पैसे न दिल्याने भोईटे यांनी देशमुख यांना फोन करून भेटून सांगितले असता कंपनीने केळी पुरवलेल्या २४ लाखांपैकी आतापर्यंत केवळ पाच लाख ८४ हजार ९९८ रुपये दिलेले आहेत. परंतु उर्वरित १८ लाख १८ हजार १५३ रुपये अद्याप दिलेले नाहीत. असाच प्रकार नबीलाल शेख यांच्यासोबतही झालेला आहे.

संबंधित कंपनीचे मालक अजिंक्य देशमुख यांच्या कंपनीला शेख यांनी २४ लाख ७५ हजार ९१७ रुपयांची केळी दिलेली होती. त्यापैकी दोन लाख ६९ हजार ९१७ रुपये कंपनीने अदा केले आहेत. परंतु उर्वरित २२ लाख ४९ हजार ११९ रुपये देण्यास नकार दिला आहे. यावरून संबंधित कंपनी व त्याच्या मालकाने व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करून फसवणूक केल्याचे दिसून आले आहे.
यानंतर संबंधित कंपनीवर दोघांनीही तक्रार दिल्यानंतर कंपनीचे मालक अजिंक्य मधुकर देशमुख रा. टेंभुर्णी तालुका माढा यांच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी धनराज भोईटे वाशिंबे यांनी तक्रार दिली आहे.
