वाढदिवस आ. ऱोहित पवारांचा आणी चर्चा बागलांची ; राष्ट्रवादी व बागल एकाच बॅनर वर
करमाळा समाचार
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या आज वाढदिवसानिमित्त सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. परंतु करमाळ्यात वेगळेच शुभेच्छा सध्या चर्चेचा विषय होत आहे. शेटफळ येथील कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देताना स्व. दिगंबरराव बागल यांच्यासह मकाई चेअरमन दिग्विजय बागल यांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत झळकलेला फोटो लक्ष वेधून घेत आहे.

मागील विधानसभेत दिग्विजय बागल व रश्मी बागल यांनी राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला खरा पण आजही त्यांचे कार्यकर्ते हे राष्ट्रवादीच्या सावलीतून बाहेर पडायला तयार नाहीत. त्याचाच एक भाग म्हणून हा बॅनर सध्या सर्वत्र फिरत आहे. त्याशिवाय स्वतः बागलही शिवसेना नेत्यांपेक्षा राष्ट्रवादीच्या नेत्यांची अधिक प्रमाणात होताना दिसतात.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सर्व मित्र परिवार शेटफळ या नावाने कार्यकर्त्यांनी एक बॅनर बनवले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना पक्षाचे नेते शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री जयंत पाटील, आमदार निलेश लंके यांच्यासह बागल यांचे फोटो झळकवले आहेत.
महाविकास आघाडी म्हणून दोन्ही पक्ष एकत्र असले तरी संबंधित कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे नाव लावत पुन्हा एकदा बागल यांना राष्ट्रवादीसोबत एक अशा पद्धतीने बॅनरबाजी केल्याचे दिसून येते. यावर बागल यांनी अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी कार्यकर्त्यांच्या मनात आजही राष्ट्रवादी असल्याचे दिसून येते. त्यामुळे आजचा बॅनर हा भविष्यातील राजकारणाची नांदी आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या हा बॅनर सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे.
आज आ. रोहित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या मित्र मंडळाने शुभेच्छाचे अनेक बॅनर बनवले होते. पवार कुटुंबीय व राष्ट्रवादीला मानणारा मोठा समुह आमच्या गावात आहे. तसेच बागल यांच्यासोबतही आमचे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे त्यांचेही फोटो आम्ही त्यात वापरले आहेत. यात राजकीय कोणताही संबंध नसला तरी दोन्ही नेते आम्हाला जवळच आहेत.
– सुहास पोळ, शेटफळ.