श्री.आदिनाथवर लवकरच प्रशासक मंडळ ? ; निवडणुकांसाठी आग्रही असलेल्या नेत्यांकडे लक्ष
करमाळा समाचार
एकीकडे मकाई सहकारी साखर कारखान्याची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे मात्र आदिनाथ सहकारी साखर कारखान्याकडे दुर्लक्ष होत असल्याबाबत समाज माध्यमातून चर्चा, तर्क वितर्क लढवले जात आहेत. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबीत ठेवलेला प्रशासक मंडळाचा विषय हा पुन्हा एकदा चर्चेला जाऊ लागला आहे. त्यामुळे आता आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर लवकरच प्रशासक मंडळ नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती करमाळा समाचारला मिळाली आहे. सदरची निवड झाल्याची माहीती काही तासांनी सुद्धा कळु शकते अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली असताना निवडणुका कधी लागते याकडे बऱ्याच जणांचे लक्ष लागून राहिले होते. तर या संदर्भात निवडणूक विभागाकडून कारखान्याला पत्र व्यवहारही झाला होता. तर कारखान्याने काही रक्कम जमा केल्यानंतर पुढील रक्कम भरण्याबाबत विचारणाही केली होती. परंतु अचानक आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक आल्याने संचालक मंडळ ही हतबल झाले व त्यांना कारखाना सोडून बाहेर पडावे लागले. त्यामुळे सध्या संचालक मंडळ ऐवजी प्रशासकाच्या हातात कारखान्याचा कारभार आहे.

कारखान्यावर प्रशासक नेमलेले असल्यामुळे येणाऱ्या काळात पुढील हंगाम कशा पद्धतीने सुरू केला जाईल व कशा पद्धतीने काम कारखाना काम करेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. त्यातच सोशल माध्यम व काही वर्तमानपत्रातून यासंदर्भात बातम्याही लावण्यात आल्या. त्याच्या आधारावर आता काही दिग्गज मंडळी प्रशासकाच्या आडुन या ठिकाणी आपल्या मर्जीतील माणसे आणता येतील अशी लोक पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. तर लवकरच या ठिकाणी प्रशासक मंडळ स्थापले जाणार असल्याची कुणकुण लागली आहे. त्यामुळे प्रशासक मंडळ हे आदिनाथच्या हितासाठी मंडळ उभारले जात आहे का ? स्वतःच्या फायद्यासाठी हे येणारा काळ ठरवेल.
आदिनाथ सहकारी साखर कारखाना खाजगीकरण नको म्हणून भाडेतत्त्वावर देण्यास नकार करणारे आदिनाथ बचाव समिती आता प्रशासक नेमल्यानंतर काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून राहिले आहे. शिवाय कारखान्यावर निवडणुका लावण्यासाठी सज्ज असलेले सर्वच राजकीय पक्ष व नेते मंडळी काय भूमिका घेतील याकडे लक्ष लागून राहील.