रस्त्याच्या कडेला ज्याचा फड, त्याच्याच ऊसाला तोड
करमाळा समाचार -संजय साखरे
परतीच्या पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने तालुक्यातील ऊस तोडणीला ब्रेक बसला आहे .तालुक्याच्या पश्चिम भागात अंबालिका व बारामती अग्रो या साखर कारखान्याने ऊस तोडीला प्रारंभ केला आहे. मात्र जोरदार पावसामुळे उसाच्या फडात पाणी साचले असून ऊसाच्या मोळ्या बाहेर काढताना मजुरांना व वाहतूक करताना वाहनधारकांना अडचण येत आहे. म्हणूनच रस्त्याच्या कडेला असलेल्या व वाहतुकीच्या दृष्टीने सोयीच्या असलेला फड तोडण्यास वाहनधारक व मुकादम प्राधान्य देत असल्याचे सध्या दिसून येत आहे. म्हणून रस्त्याच्या कडेला ज्याचा फड त्याच्याच उसाला तोड मिळल्याचे चित्र सध्या ऊस पट्ट्यात दिसून येत आहे.

या वर्षी शासनाने 15 ऑक्टोबरला गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी पावसामुळे अजून बहुतांशी साखर कारखान्याची चाके फिरली नाहीत .करमाळा तालुक्यातील चारही साखर कारखान्यानी अजून प्रत्यक्ष गाळपास सुरुवात केली नाही .
अनेक वाहन मालकांच्या टोळ्या हजर झाल्या असून सध्या तरी त्यांच्या हाताला काम नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गेल्या वर्षी लांबलेल्या गाळप हंगामामुळे ऊसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक झाली होती. नेमके यावर्षी उसाचे क्षेत्र वाढले असून गाळप हंगाम उशिराने सुरू झाल्याने शेतकरी धास्तावला आहे.

ज्या साखर कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपास सुरुवात केली असली तरी सततच्या पावसामुळे त्यांच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे अनेक वाहने फडतच रुतून बसत असल्याने त्यांना बाहेर काढताना जेसीबीचा वापर करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
एकंदरीतच शासकीय नियमानुसार 15 ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या गाळप हंगामाची सुरुवात सध्या तरी अडखळत चालू असल्याचे दिसून येत आहे.