३१ मार्च अखेर करमाळा बाजार समिती कर्जमुक्त – बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर
करमाळा समाचार
करमाळा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती च्या केंद्रीय ग्रामीण गोडाऊन योजनेचे सन २०१५- १६ सालातील मंजूर गोडाऊन चे अनुदान न मिळाल्याने सुमारे ७१ लाख रुपयांचा कर्जरुपी भुर्दड भरुन व पणन मंडळाचे थकलेले देणे ३० लाख रुपये तसेच निवडणुक खर्च ४५ लाख रुपये असे १ कोटी ४५ लाख रुपयांची देणी देऊन ३१ मार्च अखेर करमाळा बाजार समिती कर्जमुक्त झाली आहे , अशी माहिती बाजार समितीचे सभापती प्रा शिवाजीराव बंडगर यांनी पत्रकार परिषदेत दिली .

करमाळा बाजार समितीच्या ३१ मार्च २०२१ अखेरच्या आर्थिक वर्षाचा अहवाल पत्रकार परिषदेत संचालक मंडळाच्या उपस्थित प्रा. शिवाजीराव बंडगर मांडत होते .
पुढे बोलताना प्रा. बंडगर म्हणाले की २०२० -२१ या आर्थिक वर्षात बाजार समितीची १३० कोटीची उलाढाल झाली असून एकूण उत्पन्न १ कोटी ८७ लाख रुपये इतके झाले आहे .

मागील संचालक मंडळाच्या कारकिर्दीत सन २०१५-१६ सालात केंद्रीय ग्रामीण गोडाऊन योजनेच्या अंतर्गत गोडाऊन मंजूर करण्यात आले होते . ही योजना एकूण १ कोटी रुपयांची होती यांस ५०% अनुदान शासन देणार होते परंतु दुर्दैवाने हे अनुदान बाजार समितीस न मिळाल्याने चालु सत्ताधारी संचालक मंडळाने हे कर्ज रुपी ७१ लाख रुपयांचे देणे ३१ मार्च २०२१ अखेर भरले आहे , त्याचबरोबर मागील संचालक मंडळाच्या काळातील पणन मंडळाचे ३० लाख रुपयाचे देणे ही चालु संचालक मंडळाने ३१ मार्च २०२१ अखेर भरले असुन करमाळा बाजार समिती पुर्णपणे कर्जमुक्त झाली आहे .
सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात १३० कोटींची आर्थिक उलाढाल बाजार समिती झाली असून एकूण १ कोटी ८७ लाख इतका नफा करमाळा बाजार समितीस झाला आहे . संपलेल्या आर्थिक वर्षात एकूण १ कोटी ७६ लाख रुपये खर्च झालेला आहे . खर्च वजा जाता करमाळा बाजार समितीस रुपये ११ लाख इतका निव्वळ नफा झालेला आहे .
गतवर्षीच्या तुलनेत एकूण उलाढाल , एकूण नफा व एकूण उत्पन्न याच्यात प्रचंड वाढ झाली असून बाजार समितीच्या वर्तुळात चैतन्याचे वातावरण पसरले आहे .
बाजार समितीकडे असलेले कर्ज रुपी देणे , थकलेले अंशदान व निवडणुकीचा सुमारे 45 लाख रुपये खर्च सोसून करमाळा बाजार समिती ११ लाख रुपये नफ्यात आली असल्याने संचालक मंडळाचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे . यापुढे असे खर्चिक कोणतेही घटक नसल्याने बाजार समिती आणखी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल असे बंडगर म्हणाले.
अधिक माहिती सांगताना बंडगर म्हणाले की बाजार समितीच्या पश्चिम यार्डात १ हजार मेट्रिक टन क्षमतेचे अत्याधुनिक गोडाऊन व चाळणी यंत्र ची उभारणी प्रगतीपथावर असून सुमारे १ कोटी रुपयांची ही शेतकरी हिताची ईमारत 2021 या वर्षात शेतकर्यांसाठी वापरात येईल. यामध्ये शेतकऱ्यांच्या धान्याची प्रतवारी करण्याची आधुनिक व्यवस्था आहे .
करमाळा बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीचे विद्यमान संचालक मंडळाने रंगकाम केल्याने ही वास्तू देखणी दिसत असून ३५ वर्षानंतर प्रथमच इमारतीच्या बाह्यबाजुला आकर्षक रंगकाम केल्याने , इमारतीचे रूपडे पालटले आहे .
सन २०२०-२१ या वर्षात करमाळा बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच उडदाची सुमारे ८० हजार क्विंटल इतकी विक्रमी आवक झाली . उडदाला एकुण रुपये ८ हजार ४०० इतका विक्रमी दर ही दिला गेला . उडदाच्या उलाढालीतुन शेतकऱ्याला करमाळा बाजार समितीच्या माध्यमातून ४८ कोटी रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे , बाजार समितीच्या इतिहासात तुरीची देखील आवक ८५ हजार क्विंटल इतकी विक्रमी झाली असुन तुरीच्या उलाढालीतुन शेतकर्याला करमाळा बाजार समितीच्या माध्यमातून ८४ कोटी १४ लाख रुपये मिळाले आहेत . तुरीला ६९०० इतका उच्च दर ही दिला गेला .
महाराष्ट्रातील ३०७ बाजार समिती पैकी १०० बाजार समित्यांचा ई – नाम योजनेत अंतर्भाव केला गेला असून त्यात करमाळा बाजार समितीचा समावेश आहे . या योजनेअंतर्गत बाजार समितीस १६ लाख रुपयाचे साहित्य उपलब्ध झाले असून यात कॉम्प्युटर , टीव्ही, प्रतवारी चे साहित्य , प्रिंटर यांचा समावेश आहे . लवकरच त्याची सुसज्ज प्रयोगशाळा बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात स्थापित करण्यात येणार आहे .
कोरोना महामारी च्या संकटाचा कालावधीत करमाळा बाजार समितीने सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यातील गरीब शेतकऱ्यांना ४ लाख १५ हजार रुपयाचे अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले .
बाजार समिती कर्मचाऱ्यांना जुलै 2020 पासून सातवा वेतन आयोग लागू केला असून कर्मचाऱ्यांच्या पगारात भरगच्च वाढ झाली आहे. तसेच त्यांना २ महिन्यांचा बोनस ही देण्यात आला आहे.
बाजार समितीच्या व्यव्हारात प्रमुख घटक असलेल्या हमाल तोलारांना हमालीत संचालक मंडळाने घसघशीत २५% वाढ देण्याचा निर्णय ही या वर्षात घेण्यात आला .
या पत्रकार परिषदेस बागल गटाचे नेते दिग्विजय बागल ,उपसभापती चिंतामणी जगताप , संचालक सुभाष गुळवे , संचालक संतोष वारे , आनंदकुमार ढेरे , अमोल झाकणे रंगनाथ शिंदे , सरस्वती केकाण, वालचंद रोडगे , दत्तात्रय रणसिंग आदि होते .
केंद्रीय ग्रामीण गोडाऊन योजनेचे कर्ज , पणन मंडळाचे थकलेले अंक्षदान व निवडणुकीचा खर्च अशी एकूण १ कोटि ४५ लाख रुपयांची देणी देऊनही करमाळा बाजार समिती ११ लाख रुपये इतकी नफ्यात आली आहे याचा आनंद सर्वांना झाला आहे या पुढील काळात बाजार समितीची घोडदौड अधिक जोमाने सुरू राहील .
– दिग्विजय बागल (गटनेते बागल गट)
निसर्गाने दिलेली भरभरून साथ , मोठ्या प्रमाणावर विविध धान्यांची झालेली आवक , शेतकरी , व्यापारी हमाल – तोलार , बाजार समितीचे कर्मचारी यांनी संचालक मंडळाला दिलेली मोलाची साथ महत्त्वाची ठरलेली असून यापुढील काळात करमाळा व जेऊर येथे पेट्रोल पंप , कंदर येथे उपबाजार आधुनिक धान्य चाळणी यंत्र , केळी साठवण व सुविधा केंद्र इत्यादी महत्त्वाच्या योजना मार्गी लावण्याचा मानस आहे .
– प्रा. शिवाजीराव बंडगर , सभापती