श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय सदस्य बेंद्रेंची नियुक्ती रद्द
करमाळा समाचार
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक आल्यानंतर प्रशासक मंडळात बाळासाहेब बेंद्रे यांची प्रशासकीय मंडळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांना त्या पदावरून हटवून त्या ठिकाणी बी. यू. भोसले यांची नियुक्ती करण्यात आल्याबाबतचे पत्र प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर विभाग प्रकाश अष्टेकर यांनी दिले आहे. तर अशासकीय सदस्यात कोणताही बदल केलेला नाही.

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर सुरुवातीला तृतीय विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था सोलापूर बाळासाहेब बेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर अशासकीय सदस्य म्हणून महेश चिवटे व संजय गुटाळ प्रशासकीय मंडळ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. परंतु काही दिवसांपूर्वी प्रशासकीय सदस्य बेंद्रे यांच्रे नियुक्ती जैसे थे ठेवून अशासकीय सदस्य म्हणून विलासराव घुमरे, डॉ. वसंत पुंडे व ऍड. दीपक देशमुख यांची प्रशासक मंडळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

सदरच्या नियुक्ती या आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे झाल्या होत्या. लोकसभा निवडणुकी दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे पक्षातील स्थानावरुन चर्चा रंगलेल्या होत्या. पण सध्याच्या निवडीमध्ये मोहिते पाटील यांनी सुचवलेले अशासकीय सदस्य तसेच ठेवले आहेत. तर प्रशासकीय मंडळातील बाळासाहेब बेंद्रे यांची नियुक्ती रद्द करून बी.यू. भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.