गांजाची लागवड पडली महागात ; करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यावर गुन्हा दाखल
करमाळा समाचार
तालुक्यातील धायखिंडी येथील शेतकऱ्याने आपल्या घरासमोरील शेतात अवैधरीत्या गांजासदृश्य वनस्पती लावल्याने त्याच्यावर करमाळा पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरे यांना गोपणीय माहीती मिळाली त्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सदरचा प्रकार दि २५ रोजी शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास गट क्रमांक ४९/२/ब येथे उघडकीस आला आहे.

अंकुश रामु शिंदे (वय ५८) रा. धायखिंडी असे गुन्हा दाखल झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने आपल्या शेतात आर्धा फुटापासुन साडे तीन फुटापर्यत गांजा सदृश्य झाडांची लागवड केली होती सदर झाडांचे वजन साडे सहा किलो भरले त्यानंतर पन्नास ग्रॅम मुद्देमाल हा तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. संपुर्ण मुद्देमालाची किंमत अंदाजे ४५ हजार पाचशे नोंदवण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की, दाहिखिंडी येथे अवैधरीत्या गांजा लागवड करण्यात आल्याबाबत माहीती उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हीरे यांना मिळाली होती. त्यांनी लागलीच करमाळा पोलिस ठाण्याचे निरिक्षक सुर्यकांत कोकणे यांना कळवले कोकणे यांनी पोलिस उपनिरिक्षक प्रविण साने यांना पथकासह संबंधित ठिकाणी रवाना केले.
त्यावेळी अंकुश रामू शिंदे यांनी त्यांचे शेतजमीन गट क्रमांक ४९/२/ब मधील राहते घराच्या समोर असलेल्या मोकळया जागेत गांजासदृश्य वनस्पतीची लागवड करून त्याची जोपासना केली असल्याचे पाहणीतून दिसून आले. घटनेचा पुढील तपास करमाळा पोलिस करीत आहेत.