नेत्यांच्या कोलांट्याउड्यांना सामान्य नागरीक वैतागले ; निवडणुकात उभा राहण्याची तयारी
करमाळा समाचार – दिलीप दंगाणे
सत्तेसाठी किंवा ईडीच्या भीतीने आजकाल राजकारणी कोणत्याही पक्षात उड्या मारून जात आहेत अशा राजकारणाला जनता आता कंटाळली आहे या कंटाळवाण्या राजकारणाची दुसऱ्यांची मजा बघत बसण्यापेक्षा आता आपणही लोकसभेच्या निवडणुकीत उभा राहणार सामान्य जनता राजकारण्याला कंटाळलेली असून जनतेने आता वेगळे निर्णय घेण्याची गरज आहे असे मत विनोद दाळवाले यांनी व्यक्त केले

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार फुटून विरोधी गटात जाऊन मिळाले. तर त्यानंतर काही दिवसातच राष्ट्रवादीचे आमदारही त्यांच्या पाठोपाठ सत्ताधारी झाले . तर आता काँग्रेस मधूनही एक एक करत आमदार भाजपच्या वाटेवर जात असताना दिसून येत आहेत. याच्या मागे ईडी व सत्ता असे दोन्ही समीकरणे असल्याचे दिसून येत आहे. परंतु सदरचे राजकारण हे जनतेचे हिताचे नसून जनतेला आता कोणी वालीच राहिला नाही.

जे लोक एकमेकांवर शिंतोडे उडवत होते तेच आज एकाच बाकावर बसलेले दिसणार आहेत. त्यामुळे आता कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा या परिस्थितीला बदलण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आता निवडणुकीच्या वाटेवर चालले पाहिजे.
लोकसभा निवडणुकीत मी ही स्वतःचा अर्ज भरणार आहे. तुम्हीही मैदानात उतरा व प्रस्थापितांना धूळ चारा असे आवाहन यावेळी दाळवाले यांनी केले आहे. दाळवाले हे सामान्य नागरीक आहेत. पण त्यांच्या मध्ये सध्या राजकाऱणी लोकांबद्दल जो राग आहे तो आता बाहेर पडत आहे. त्यामुळे कोणाचाही झेंडा घेऊन नाचण्यापेक्षा आता स्वतः मैदानात उतरणार आहेत. याशिवाय इतर लोकशाही जपणाऱ्यां नागरिकांनीही याचा विचार करणे गरजेचे आहे.