ग्राहकांच्या कर्ज प्रकरणात घोळ ; बंधन बॅंकेच्या व्यवस्थापकासह तीघांवर गुन्हा दाखल
करमाळा समाचार
करमाळा शहरातील बंधन बँक मध्ये तब्बल ३४ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी व्यवस्थापकसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधितांनी बँकेच्या ११४ कर्जदार ग्राहकांच्या कर्ज प्रकरणातील काही रक्कम दिली परंतु ३४ लाख १५ हजार रक्कम ही कर्जदाराला न देता स्वतःकडे ठेवली. सदरचा प्रकार एप्रिल २०२३ ते जून २०२३ दरम्यान उघडकीस आला आहे. तर गुरुवारी (दि ७) रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

व्यवस्थापक सुजित बिश्वास मुळ रा. कोलकत्ता, शिफा शेख अब्दुल रहमान कॅशियर, कोमल शिंदे खाजगी महिला दोघी रा. जामखेड ता. कर्जत जिल्हा अहमदनगर अशा तिघांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विभागीय व्यवस्थापक बंधन बँक, औरंगाबाद मयूर निखार यांनी तक्रार दाखल केली आहे. यातील व्यवस्थापक बिश्वास यास अटक केली असुन चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुजित बिश्वास हे करमाळा शाखेत २०२१ पासुन व्यवस्थापक म्हणून काम करत होते. एप्रिल २०२३ ते जुन २०२३ यादरम्यान सदर बँकेमध्ये ११४ कर्ज प्रकरणी देण्यात आली. यामध्ये एकूण ५० लाख ३० हजार कर्ज वाटप करण्यात आले. त्यापैकी बँक रेकॉर्डनुसार कर्जदार यांच्या खात्यावर डिपॉझिट म्हणून दोन लाख ३२ हजार रुपये ठेवून त्यांना १३ लाख ८३ हजार रुपये दिले. तर मंजूर कर्जातील कर्जदार यांना ३४ लाख १५ हजार न देता स्वतःच्या आर्थिक फायदा करिता वापर करून तसेच कर्जदार यांना कर्ज मंजूर करते वेळी नियम बाह्य कर्ज मंजूर करून बँकेच्या नियमांचे उल्लंघन केले व दिशाभूल केली आहे. यामध्ये व्यवस्थापक सुजित विश्वास, कॅशियर शिफा शेख अब्दुल रहमान, कोमल शिंदे यांनी सदरची फसवणूक व विश्वासघात केल्याची तक्रार बँकेच्या वतीने देण्यात आले आहे. सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एन. जगदाळे हे करीत आहेत.