राष्ट्रवादीची शिवसेना असल्याची विरोधकांची टिका ; करमाळ्यात पहायला मिळाले तसेच काहीसे चित्र
प्रतिनिधी | करमाळा
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना तीन वर्षाने सुरु होतोय कामगारांसह सभासद शेतकऱ्यात उत्साह आहे. पण एका महिन्यापेक्षा जास्त उशिरा सुरू होत असलेला कारखाना किती दिवस गाळप हंगाम करेल यात तरी शंका असली तरी यामुळे तालुक्याच्या राजकारणात बागलांना विश्वास परत मिळवणे तर माजी आमदार पाटील यांना एक नवी संधी उपलब्ध झाली आहे. पण मागील सर्व घडामोडी मध्ये शिंदे गट शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादीची शिवसेना असे होत असलेले आरोप हे योग्य असल्याचे वाटू लागले आहेत. त्यामुळे येणारा काळ हा उद्धव सेनेसाठी करमाळा तालुक्यातील अडचणीचा ठरू शकतो. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी एकत्र येण्याचे आवाहन पाटील बागल यांना केले असले तरी ते सोबत राहतील का ? हे सांगणे कठीण आहे त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात काही मोठे बदल झालेत हे बोलणे घाईचे ठरेल.

मागील विधानसभेपूर्वी करमाळा तालुक्याच्या राजकारणात मोठे फेरबदल झाले होते. शिवसेनेने आपल्या विद्यमान आमदाराला डावलत राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांना विधानसभेचे तिकीट दिल्याने पाटील यांनी नाराज होत शिवसेनेतून बाहेर पडत विधानसभा उमेदवारी ठाकली होती. त्यामध्ये तालुक्यात पहिल्या तर करमाळा माढा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते माजी आमदार नारायण पाटील यांना मिळाली व अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे हे निवडून आले. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना झाली. यातून शिवसेनेला मुख्यमंत्रीपद जरी मिळाले असले तरी शिवसेनेच्या शिंदे गटाने जसे आरोप केले त्या पद्धतीने शिवसैनिकांवर एक प्रकारे अन्याय होताना दिसत होता. त्याची प्रचिती आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात सत्ताधारी गटात असलेल्या बागल गटाला ही आली.
राज्याच्या राजकारणात सत्तेत असतानाही आदिनाथ साठी शिवसेनेकडून कसलेही सहकार्य मिळत नसल्याचे दिसून आले. इतकंच काय तर ज्यावेळी बागलांना पक्षाची जास्त गरज होती त्यावेळी पक्ष अपेक्षीत सहकार्य करताना दिसत नव्हता. १२० कोटींची साखर शिल्लक असताना कारखाना बॅंकेने ताब्यात घेतला. त्याचा तोटा झाला व कारखाना हा बँकेच्या ताब्यात गेला बँकेने सदरचा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला याची खंत गळीत हंगाम भाषणावेळी रश्मी बागल यांनीही बोलुन दाखवली. तर बॅंकेच्या निलावात बारामती ॲग्रोने लक्ष घातले व निलावात जास्त बोलीही लागली. कारखाना ॲग्रो कडे देण्याचे जवळपास निश्चित झाले. त्यामुळे सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने बारामती ॲग्रोच्या हिताचे निर्णय घेतल्या सारखे वाटू लागले.

अखेर सत्ता बदल झाला व शिंदे गटात आरोग्य मंत्री असलेले तानाजीराव सावंत यांनी सूत्रे हातात घेतली व भाडेतत्त्वावर जाणारा कारखाना ऐनवेळी सहकारी तत्त्वावर पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी बागलांना सहकार्य केले. त्यामुळे आता बागल व पाटील हे कारखान्यासाठी पुन्हा एकदा एकत्र आले. त्या संधीचा फायदा उचलत शिवसेना शिंदे गटाकडून आर्थिक तसेच इतर सर्व सहकार्य करण्यात आले. त्यामुळे आज कारखाना पुन्हा एकदा सहकारी तत्त्वावर सुरू होत आहे. त्याचा फायदा येणाऱ्या काळात शिंदे गट शिवसेनेला नक्कीच होताना दिसेल. तर यामुळे उद्धव सेनेचे मात्र मोठे नुकसान होताना दिसत आहे.
बागलांना विश्वास मिळवण्याची तर पाटलांना काम करुन दाखवण्याची संधी…
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात रश्मी बागल यांची सत्ता आहे. कारखाना बंद पडण्यासाठी बागल गटाला जबाबदार धरले जात होते. यामुळे त्यांना विधानसभेवेळी मोठ्या प्रमाणावर नुकसान ही सोसावे लागले व त्यांचा दारुण पराभव झाला. या पराभवा मागे कारखाना असल्याचे त्यांच्या लक्षात आले व कामगारांच्या हितासाठी त्यांनी दोन पावले मागे घेत राजकीय विरोधक नारायण पाटील यांच्याशी सलगी करत कारखाना सुरू करण्यास पुढाकार घेतला.
त्यामुळे आता कारखाना सुरळीत चालू झाला तर बागलांवर लागलेले आरोप बाजूला होत ते पुन्हा एकदा विश्वास प्राप्त करून घेऊ शकतात. तर माजी आमदार नारायण पाटील यांनाही कारखान्याच्या माध्यमातून काम करून दाखवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.