आणखी एका महत्वपूर्ण कामावरील स्थगीती शिंदे सरकारने उठवली – लवकरच काम मार्गी – आ. संजयमामा शिंदे
करमाळा समाचार -संजय साखरे
सन 2021 – 22 या अर्थसंकल्पात जिल्हा हद्द – कोंढार चिंचोली- खातगाव ते पोमलवाडी प्रजिमा 3 या रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी( डिकसळ पुल ) 55 कोटी रु निधी मंजूर झालेला होता. परंतु महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या सरकारने पूर्वीच्या सरकारने मंजूर केलेल्या सर्वच कामावरती दि.23 जुलै रोजी च्या पत्राद्वारे स्थगिती दिली होती. त्यामुळे डिकसळ पुलाचे काम स्थगित केलेले होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिनांक 11 नोव्हेंबर 2022 च्या परिपत्रकानुसार सदर डिकसळ पुलाच्या कामावर बसविलेली स्थगिती उठविली असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली. सदर पुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी आपण आग्रही असून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यासह पुणे जिल्हा व अहमदनगर जिल्हा या सर्वांच्या दृष्टीने डिकसळ पुल हा दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याची माहिती ही आमदार संजय मामा शिंदे यांनी यावेळी दिली.

करमाळा विधानसभा मतदारसंघातील दळणवळण सुलभ होण्याच्या दृष्टीने प्रमुख जिल्हा मार्ग 190 असून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुका यांना जोडणारा डिकसळ पुल आहे .त्यामुळे सदर पुलाचे काम होणे अत्यंत आवश्यक आहे. या पुलाचे काम झाल्यास ऊस उत्पादक शेतकरी, नागरिक, शालेय विद्यार्थी , रुग्ण यांना रहदारीचे दृष्टीने सोयीचे होईल. सोलापूर जिल्ह्यासह पुणे जिल्हा व अहमदनगर जिल्हा यांना दळणवळणाच्या दृष्टीने डिकसळ पुल हा अत्यंत महत्त्वाचा आहे.