जमीन मालकाच्या परवानगी शिवाय विक्रीची बनावट नोटरी ; करमाळ्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी | करमाळा
जमीन मालकाच्या परवानगीशिवाय जमिनीचा व्यवहार करण्यासाठी सुरूवातीचे दहा लाख रुपये घेतले म्हणून बनावट नोटरी केल्याप्रकरणी एकावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदरचा प्रकार संशयित आरोपीने तहसील कार्यालय येथे विजेचे कनेक्शन आपल्या नावे व्हावे यासाठी मागणी अर्ज केला होता त्यावेळी उघडकीस आले. शिवाय संबंधित व्यक्ती ही बनावट नोटरी दाखवून सर्वांना जागा घेतल्या बाबत खोटी माहिती पुरवत असल्याचेही माहिती मिळाल्यानंतर मूळ मालकाने गुन्हा दाखल केला आहे.

संशयीत सोहेल अब्बास शेख रा. करमाळा याच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉ. वैशाली प्रकाश मेहता वय ४५ रा. चाकण ता. खेड जिल्हा पुणे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वैशाली मेहता यांचे करमाळ्यात माहेर आहे. तर वडील व आई यांच्या मृत्यूनंतर करमाळा येथील सिटी सर्वे नंबर २७१२/ ब ही जागा वैशाली मेहता यांच्या नावे झाली होती. सदरची जागा ही मुख्य चौकात असल्याने त्या जागेला मागणी मोठ्या प्रमाणावर होती. परंतु मेहता यांना सदरची जागा विकायची नव्हती त्यामुळे त्यांनी तसा व्यवहार कोणाशीच केला नव्हता. पण काही दिवसांपासून शेख यांनी करमाळ्यात आपण जागा घेतल्या बाबत सांगण्यासाठी सुरुवात केली व या संबंधित नोटरी ही झाल्याचे त्यांनी सर्वांना सांगितले. यावेळी सदरचा प्रकार हा मेहता यांच्या निकटवर्तीयांनी मेहता यांच्याकडे बोलून दाखवला. त्यावेळी त्यांनी असा कोणताच व्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट केले.

अधिक माहिती घेण्यासाठी वैशाली मेहता या करमाळा येथे आल्यानंतर त्यांच्या घराचे लाईट कनेक्शन हे आपल्या नावे व्हावे यासाठी सोहेल शेख याने १३ मे रोजी तहसील कार्यालयाकडे अर्ज केल्याचे दिसून आले. त्यावरून सदर प्रकार उघडकीस आला. यावेळी विद्युत कनेक्शन बाबत तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर सोहेल यास समोर बोलावले त्याने त्याच्याकडील १ एप्रिल २२ रोजीची नोटरी दाखवली. यावेळी या नोटरीवर दहा लाख दिल्याचे लिहिण्यात आले होते. परंतु त्यादिवशी वैशाली मेहता या करमाळा तालुक्यात आल्याच नव्हत्या असे मेहता यांनी स्पष्ट केले. तर त्या नोटरी वर बनावट सही, फोटो घेऊन नोटरी केल्याचे दिसून आले.
सदर नोटरी वर साक्षीदार म्हणून तुषार शिंदे रा. पोथरे व फत्तू शेख रा. खोलेश्वर चौक, काष्टी नगर असे दोघांची नावे असलेले आधार कार्ड जोडल्याचे दिसून आले. वास्तविक पाहता सध्या वैशाली मेहता यांचे मतदान कार्डावर सासर कडचे वैशाली पंकज शहा असे नाव असताना देखील वैशाली मेहता या नावाने नोटरी झाल्याने संशयितांवर ही संशय अधिक बळकट होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रारी अर्जाची चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत