दुष्काळी परिस्थितीमध्ये फळपिके व शेती पिके वाचविणे उपाययोजना मार्गदर्शन व प्रात्यक्षिक
करमाळा समाचार
दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये फळ पिके वाचवण्यासाठी विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन आज दि ०९ रोजी सकाळी ठिक श्री आशिष अडसूळ मौजे करमाळा (ग्रा) यांच्या प्रक्षेत्रावर आयोजित केलेले होते. यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना दुष्काळी परिस्थितीमध्ये आपली पिके वाचवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना विषयी तालुका कृषी अधिकारी श्री संजय वाकडे यांनी मार्गदर्शन केले.

मार्गदर्शन करताना त्यांनी उन्हाळी पिकासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे, जेणेकरून पाण्याची बचत होईल असे सांगितले, तसेच शेतातील पालापाचोळा, उसाचे पाचट, काडीकचरा ई फळबागा आच्छादनासाठी वापर करावा, त्यामुळे पाण्याची गरज 20 ते 30 टक्के कमी होते. याविषयी माहिती देवून जैविक आच्छादनाविषयी उपस्थित शेतकरी बांधवांना प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच कलमे रोपे/भाजीपाला रोपे तयार करण्यासाठी शेडनेटचा वापर करण्याबद्दल माहिती दिली.

तसेच मृद आरोग्य पत्रिका चा वापर करून शेतकऱ्यांनी शेत पिकासाठी सुपीकता निर्देशांकानुसार रासायनिक खतांचा वापर करण्याबद्दल माहिती दिली, तसेच सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे उन्हाच्या तीव्रतेमुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होत आहे .अशा वेळी शक्य तेथे परावर्तकाचा वापर करावा. उदा. अँटिट्रेस केओलीन/ पांढरा रंग/ सिलिकॉन/ ग्रीन मिरॅकल/ हेल्मेट/ गार्ड-५ ई चा 40 ते 50 मिली 15 लिटर पाण्यात मिसळून सकाळी ७ वाजेच्या आधी किंवा सायंकाळी ६ नंतर फळ पिके तसेच नवीन लागवडीच्या केळी रोपांवर फवारण्या घेण्याविषयी माहिती दिली.. जेणेकरून रोपांना काही अंशी हिट शॉक बसणार नाही याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
तसेच पिकाच्या अंतरंगातून मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन कमी करण्यासाठी खालच्या भागातील जीर्ण झालेली पाने कमी करावीत, त्यामुळे पिकाचा ताण कमी होण्यास मदत होते याचे प्रात्यक्षिक करून दाखवणे.
उष्ण वाऱ्यापासून आपल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फळबागेच्या भोवती वारा प्रतिरोधकाचा वापर करण्याविषयी मार्गदर्शन केले., जेणेकरून जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते या विषयी माहिती दिली.
दुष्काळी परिस्थितीमध्ये या सर्व बाबींचा अवलंब तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपली पिके वाचविण्यासाठी करण्याबाबत आवाहन श्री संजय वाकडे तालुका कृषी अधिकारी करमाळा यांनी केले. यावेळी हिवरवाडी, मांगी,करमाळा (ग्रा) येथील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कृषी सहाय्यक श्री विजय सोरटे , श्री टी एल चव्हाण व श्री दत्ता वानखेडे यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी मदत केली. श्री गणेश माने कृषी सहाय्यक यांनी उपस्थित शेतकरी बांधवांचे आभार मानले.