पाणी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी दिवाळीसारखा आनंद
करमाळा समाचार
2017 साली दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी करमाळा तालुक्यात सुरू झाले. परंतु या योजनेतील अर्जुननगर व हिसरे या गावांना पाणी मिळाले नव्हते . या गावांना पाणी मिळण्यासाठी 2020 साल उजाडले.

यापूर्वी अनेक वेळा ग्रामस्थांनी मागणी करूनही अर्जुन्नगर , हिसरे या गावांना पाणी मिळाले नव्हते. निधीअभावी कॅनॉलची कामे अपूर्ण होती. या अपूर्ण कामामुळे योजनेत असूनही अर्जुन्नगर व हिसरे ही गावे पाण्यापासून वंचित राहतात ही बाब करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शेलगाव मार्गे या गावांना तात्पुरत्या स्वरूपात पाणी सोडण्याच्या सूचना केल्या होत्या. जोपर्यंत कॅनॉलचे अपूर्ण काम पूर्ण होत नाही तोपर्यंत या मार्गे पाणी दिले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार जानेवारीमध्ये या गावांना प्रथम पाणी मिळाले .त्यानंतर आता सप्टेंबरमध्ये दुसऱ्या वेळेस पाणी मिळाले आहे. गावात पाणी आल्याचा आनंद ग्रामस्थांनी पाणी पूजन करून साजरा केला.
हीच आमची दिवाळी
जानेवारी महिन्यात प्रथम आमच्या गावातील सर्व बंधारे दहीगावच्या पाण्याने तुडुंब भरले ते पाणी आम्हाला आत्तापर्यंत पुरले होते .त्यानंतर आता परत आम्हाला पाणी मिळाले आहे. या पाण्यामुळे आमचे बारमाही पिके घेण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे .त्यामुळे दिवाळीला अजून वेळ असतानाही आमच्या गावात आनंदाचे वातावरण आहे. हीच खरी आमची दिवाळी आहे.

– समाधान भोगे( ग्रामस्थ अर्जुन्नगर)