नियम पाळता येत नसतील तर बनवताच कशाला ? लसीकरणाचा गोंधळ
करमाळा समाचार
आरोग्य विभागाच्या सततच्या नियम बदलामुळे लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमके ऑनलाईन बुकिंग करायची की स्लिप घेऊन आरोग्य केंद्रावर लसीसाठी जायचं हा नेमका प्रश्न लोकांना पडलेला आहे.

त्यातच मागील वेळी उत्कृष्टपणे नियोजन केलेले कोर्टी आरोग्य केंद्र आता नियमा शिवाय वागताना दिसत आहे. लोकांनी मोठी गर्दी केली असून जर नियम पाळता येत नसतील तर नियम बनवतात कशाला असा प्रश्न युवानेते श्रीकांत साखरे यांनी विचारला आहे.

परिसरातील वीट, कोर्टी, सावडी व इतर गावांसाठी 371 लस उपलब्ध झाली आहे. कोर्टी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केले जात आहे. प्रत्येकी गावासाठी वेगवेगळ्या लसी उपलब्ध केल्या गेल्या आहेत. त्यामध्ये राजुरी गावासाठी वीस लसींचा कोठा आल्याने त्या गावातील शिक्षक तसेच ग्रामसेवक यांना सोबत घेऊन प्रत्येकाला स्लिप वाटप करण्यात आली. पण त्या लोकांना नियमाप्रमाणे उभे न करता बिगर सलीप वाले ही समोर जाऊन लगेच घेऊन येत आहेत.
त्याशिवाय वशिलेबाजी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गर्दी भरमसाठ झालेली आहे. त्या गर्दीवर कोणाचाही कंट्रोल नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत नियम आपणास पाळणे होत नसेल तर नियम कशाला बनवता असा प्रश्न साखरे यांनी विचारला आहे. यासंदर्भात त्यांनी करमाळा तालुका तसेच जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांचा संपर्क साधत याबाबत माहिती दिली आहे.
शिक्षकांनी सदरच्या कामावर बहिष्कार घातलेला असताना आम्ही सर्व शिक्षकांना विनंती करुन गावातील बिपी शुगर आदी त्रास असलेल्या लोकांना संधी मिळावी म्हणुन प्रयत्न केले. त्यांची यादी तयार करून दिली. पण आम्हाला प्राधान्य द्यायचे सोडून त्यांच्याकडे लसी ची पावती नाही अशांना प्राधान्य दिले जात असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे.
– श्रीकांत साखरे, युवा नेते