केम मध्ये व्यापारी गाळ्यांचा झोल ? ; आचारसंहिता काळात गाळे वाटप – तळेकर
करमाळा समाचार
तालुक्यातील केम येथील ग्रामपंचायत हद्दीत मरीआई मंदिरा शेजारील गाळे फाउंडेशन बेकायदेशीर पद्धतीने वाटप झाले आहे. सदर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी प्रहारचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना पाठवले आहे. तर सदरचे निवेदन गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

तालुक्यातील केम येथील ग्रामपंचायत ने ग्रामपंचायत आचारसंहिता सुरू असताना १८ ऑक्टोंबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत मरीआई मंदिर शेजारील बेकायदेशीर बांधलेले गाळे फाउंडेशन जागेचा कुठल्याही प्रकारचा निलाव अथवा कोणतीही प्रकारची आधी सूचना केम ग्रामस्थांना न देता गावातील काही स्थानिक राजकीय पुढार्यांच्या संगनमताने प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून दहा ते अकरा लोकांना गाळा वाटप करून त्यांच्याकडून ग्रामपंचायतकडे रक्कम रुपये दहा हजार रुपये लोकांनी जमा केले आहेत. तसेच सदरील रकमेच्या पावत्यावरही ग्रामसेवकाची सही न घेता त्रयस्थ लोकांची सही करून पावत्या वाटप करण्यात आले आहेत.

सदर जागेमध्ये असणारे व्यापारी गाळा फाउंडेशन नियमानुसार असल्यास सदरील जागा फाउंडेशनचा फेर निलाव करण्यात यावा. ही बाब अत्यंत गंभीर असल्यामुळे आपण स्वतः प्रकरणाची लवकरात लवकर तपासणी करून संबंधित अधिकारी दोषी ठरल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व केलेल्या कारवाईची प्रत द्यावी अन्यथा प्रहार स्टाईलने बोंबाबोंब आंदोलन व पंचायत समिती कार्यालयाला टाळेठोक आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.