जगताप गट करमाळ्यातुन मोहिते पाटलांना मताधिक्य देणार – जगताप
करमाळा समाचार
सध्याची लढाई ही जगताप, मोहिते पाटील, निंबाळकर, मोदी किंवा राहुल गांधी यांची नसून ही सामान्य जनतेची व शेतकऱ्यांची लढाई झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर लढाई जिंकणे गरजेचे आहे. त्यामुळे आज आम्ही सर्व मिळून मोहिते यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी जाहीर केले. तर केवळ पाटील गटावर अवलंबून न राहता जगताप गटाला सोबत घ्या म्हणत परकिय पार्सल माघारी पाठवायचे असल्याचेही जगताप म्हणाले. तर आम्ही तुम्हाला लीड दिल्याशिवाय तोंड दाखवणार नाही असेही जगताप म्हणाले.

ते करमाळा येथे आयोजित बैठकीदरम्यान बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मोहिते पाटील गटाच्या नेत्या शितलदेवी मोहिते पाटील या उपस्थित होत्या. तसेच अमरजीत साळुंके, देवानंद बागल, ज्ञानदेव फंड, प्रशांत ढाळे, संतोष कटारिया यांच्यासह जगताप गटातील प्रमुख कार्यकर्ते यावेळी सदर बैठकीला उपस्थित होते.

शहरातील सर्व गट विरोधात असतानाही जगताप गटांने मागील वेळी संजयमामाच्या विरोधात असलेल्या निंबाळकर यांना मताधिक्य मिळवून दिले होते. तर जगताप गट सोबत असल्यामुळे यंदा मोहिते पाटील यांना मताधिक्य दिल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही माजी नगरसेवक एडवोकेट नवनाथ राखुंडे यांनी दिली.
माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या गटातील प्रमुख कार्यकर्ते आज सदर बैठकीला उपस्थित आहेत. तर त्यांनी एकमताने मोहिते पाटील यांना पाठिंबा दिल्याचे दिसून येत आहे. यामुळे जगताप गटात दोन गट दिसून येत आहेत. त्यामध्ये एक गट वैभवराजे यांच्या सोबत तर दुसरा गट शंभूराजे यांच्या सोबत जाताना दिसत आहे. आजच्या बैठकीला मोठ्या प्रमाणावर माजी नगरसेवक व इतर पदाधिकारी उपस्थित राहिल्याने मोठी ताकद वैभवराजे यांनी उभा केल्याचे दिसून येत आहे. याचा फटका नक्कीच निंबाळकरांना बसेल असे दिसून येते.