तीस हजारांची मागणी वीस वर तडजोड ; लाचलुचपत विभागाची कारवाई
करमाळा –
तालुक्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामाचे प्राथमिक बील काढण्याकरिता म्हणून लाचेची मागणी करणाऱ्या जिल्हा परिषद बांधकाम विभागातील शाखा अभियंता तथा प्रभारी उपअभियंता बबन गायकवाड (वय ५७) रा. करमाळा यांना लाचलुचपत विभागाच्या वतीने २० हजार रक्कम स्वीकारताना पकडण्यात आले आहे. सदरची कार्यवाही दि २७ रोजी दुपारी करण्यात आली. विशेष म्हणजे संबंधित अभियंता हे दोन महिण्यात निवृत्त होणार होते.

तालुक्यातील ठेकेदार जिल्हा परिषद बांधकाम विभाग अंतर्गत सुरू असलेले वांगी क्रमांक दोन येथील रस्ता सुधारणा करणे, वरकुटे ते साडे रस्ता सुधारणा करणे व वीट चोपडे वस्ती ते झरे रस्ता सुधारणा करणे या कामांची निविदाद्वारे वर्क ऑर्डर निघालेली आहे. सदर कामाची सर्व जबाबदारी पार पाडून बिलाच्या अनुषंगाने सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी जबाबदारी सुपरवायझर या नात्याने यातील तक्रारदार यांची होती. त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी पाठपुरावा केला असता सदर कामापैकी वांगी क्रमांक दोन येथील रस्ता सुधारणा या कामाचे प्राथमिक बील तक्रारदार यांना प्राप्त झाले होते.

सदर बिल काढण्यासाठी मोबदला तसेच उर्वरित दोन कामाचे प्राथमिक बील काढण्याकरिता म्हणून लोकसेवक उपअभियंता बबन गायकवाड यांनी तक्रारदार यांच्याकडे तीस हजार लाचेची मागणी केली. तडजोडांची २० हजार लाच देण्याचे ठरले. सदरची रक्कम स्वीकारत असताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रचलेल्या सापळ्यात गायकवाड हे अडकले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सदरच्या सापळ्यात प्रमुख म्हणून पोलीस निरीक्षक लाचलुचपत विभाग सोलापूर गणेश पिंगूवाले, पोलिस अंमलदार प्रमोद पकाले, राजू पवार, रवी हटखिळे, श्याम सुरवसे आदींनी कार्यवाही यशस्वी पार पाडली.