बायकोसाठी मेव्हण्याचे अपहरण नवऱ्याला एकवर्ष सक्तमजुरी ; करमाळा न्यायालयाचा निकाल
करमाळा समाचार
माहेरी गेलेली बायको परत माझ्याकडे पाठवा म्हणत मेव्हण्याचे अपहरण करून दांबुन ठेवलेल्या जावयाला चार वर्षांनी एक वर्ष एक महिना सक्त मजुरी व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदरचे प्रकरण २० नोव्हेंबर २०१९ मध्ये साडे हायस्कूल परिसरात घडले होते. या ठिकाणाहून सातवीत शिकत असलेल्या मेहुण्याची अपहरण केले होते. त्यानंतर मुख्याध्यापकांनी गुन्हा दाखल केल्यानंतर जावयाला अटक करण्यात आली होती.

विनोद कांतीलाल जाधव (वय २९) रा. साडे असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मुख्याध्यापक व अपहरण केलेल्या मुलासह सात जणांची साक्ष तपासण्यात आली. मुलगा आपल्या साक्षेवर ठाम राहिल्याने सदर प्रकरणात शिक्षा ठोकवण्यात मदत झाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, विनोद कांतीलाल जाधव याच्या घरगुती वादातून बायको माहेरी जाऊन राहत होती. तिला बोलावले तरी ती माघारी येत नव्हती. त्यामुळे वैतागून विनोद जाधव याने सातवी मध्ये शाळेत शिकत असलेल्या मेव्हण्याचे अपहरण करण्याचे ठरवले. त्यानंतर साडे येथील शाळेत जाऊन त्याला गोड बोलून सोबत घेतले व टेंभुर्णी येथील एका लॉजवर त्याला दाबून ठेवले. तर मेव्हण्याचे अपहरण केल्यानंतर सासरी निरोप दिला की मेव्हणा पाहिजे असेल तर बायकोला पाठवा.
त्यानंतर करमाळा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक भाऊसाहेब कंगणे यांनी सदर मुलाच्या अपहरणाची तक्रार दिली. यावरून करमाळा पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी पोलीस नाईक अनिल निंबाळकर व पोलीस शिपाई प्रवीण साठे यांनी विनोद जाधव यास टेंभुर्णी येथून ताब्यात घेतले. त्यानंतर सदरचे प्रकरण करमाळा न्यायालयात सुरू असताना संबंधित मुलगा, मुख्याध्यापक, मुलाचे वडील यांच्यासह सात जणांची साक्ष तपासण्यात आली. या प्रकरणात मुलाने संपूर्ण प्रकरणात साक्ष नोंदवत वस्तुस्थितीवर ठाम राहिल्याने सदर घटनेबाबत सबळ पुरावे व मुलाची साक्ष याच्या आधारावर विनोद जाधव यास एक वर्ष एक महिना सक्तमजुरी व दहा हजार पाचशे रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती बी. ए. भोसले यांनी ठोठावली आहे. सरकारी वकील म्हणून ॲड. एस. एस. लुणावत व ॲड. एस. आर. जोशी तर कोर्ट ऑर्डली म्हणून पोलीस नाईक गणेश ताकभाते यांनी काम पाहिले.