लसीकरणानंतरही जनावरांच्या अंगावर लंम्पीच्या गाठी ; लक्षणे दिसल्यास दवाखान्यात न्या – वैद्यकीय अधिकारी
करमाळा समाचार
तालुक्यात लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पावले उचलण्यात आली होती. यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये ५० हजार गायींवर शंभर टक्के लसीकरण करण्यात आले आहे. तरीही जनावरांच्या अंगावर गाठी येत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पण तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भीतीचे कारण नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सध्या तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळताना दिसत आहे.

करमाळा तालुका व परिसरात जनावरांना लंम्पी हा आजार होऊन जनावरांमध्ये खाण्याचे प्रमाण व दुधाचे प्रमाण कमी झालेले दिसून येत होते. तर अंगावर गाठी येणे व इतर लक्षणे दिसल्यानंतर गायींना वेळेत इलाज न झाल्यास दगावतही होते. त्याचा अंदाज घेत प्रशासनाच्या वतीने वेळीच लसीकरण मोहीम हातात घेण्यात आली होती. याच्या माध्यमातून तालुक्यात सर्वत्र लसीकरण करण्यात आले. गावोगावी लसीकरण झालेले असताना काही दिवसात पुन्हा एकदा अंगावर फोड येत असल्याचे दिसून येऊ लागले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. उंदरगाव मांजरगाव रिटेवाडी परिसरात जवळपास ८० ते ९० जनावरांच्या अंगावर सदर लंम्पी सदृश्य गाठी दिसून आल्याने शेतकरी चिंतेत आहे. या संदर्भात माहिती घेऊन उपचार करण्याची मागणी होऊ लागली आहे.

आमच्या भागामध्ये मागील महिना भरापूर्वी लसीकरण झाले होते. लसीकरणानंतरही गायीमध्ये लंम्पीचा प्रादुर्भाव व त्याची लक्षणे दिसू लागली आहेत. त्यामध्ये अंगावर गाठी येणे अशा प्रकारचे लक्षण दिसत आहेत. लसीकरणानंतर जर असे होत असेल तर लसीकरणावर संशय व्यक्त होत आहे. वेळीच प्रशासनाने दखल घेऊन उपचार करावेत.
– ॲड. राजेंद्र पवार, रिटेवाडी.
काळजीचे कारण नाही …
आपल्या तालुक्यात १००% लसीकरण पूर्ण झालेले आहे. लसीकरण नंतरही कोणत्या जनावरांच्या अंगावर गाठी येत असतील तर घाबरून जाण्याची गरज नाही. काही जनावरां मध्ये तशी लक्षणे दिसून येतात. पण ते धोकादायक नाही. चार ते पाच दिवसानंतर त्या गाठीही जिरून जातात. तर संबंधित जनावराचे गाठी कमी झाल्या नाहीत व दूध देणे कमी झाले किंवा जनावराने खाणे कमी केले तर जवळच्या दवाखान्यात त्याची तपासणी करून घ्यावी तोपर्यंत चिंता करू नये. शिवाय ज्यांचे लसिकरण राहिले आहे त्यांनी करुन घ्यावे.
– डॉ. मनीष यादव, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी करमाळा.