करमाळ्याची सुप्रसिद्ध किर्तनकार युवतीचा साखरपुड्यात विवाह ; समाजापुढे नवीन आदर्श
करमाळा – संजय साखरे
आपल्या अमोघ वाणीने आणि वक्तृत्वाने महाराष्ट्रातील कीर्तन रसिकांना वेड लावणाऱ्या व आपल्या कीर्तनातून स्त्री भ्रूण हत्या ,बालविवाह, समाजातील अनिष्ट रूढी प्रथा परंपरा यावर कडाडून हल्ला चढविणाऱ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प सपना महाराज साखरे यांचा विवाह सोहळा काल पिंपळवाडी तालुका करमाळा येथे गोरज मुहूर्तावर पार पडला.

निमित्त होते साखरपुड्याचे मात्र झाले शुभमंगल. पिंपळवाडी तालुका करमाळा येथील रहिवासी व करमाळा येथील महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री हनुमंत वीर सर यांचे चिरंजीव वैभव (आय टी अभियंता,पुणे) व राजुरी तालुका करमाळा येथील बाळासाहेब मारुती साखरे यांची कन्या ह. भ .प चि. सौ. का सपना ( एम. ए) यांचा साखरपुडा कार्यक्रम काल दुपारी पिंपळवाडी येथे आयोजित करण्यात आला होता. परंतु साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यानंतर वधू पक्षाकडील काही मंडळींनी विवाहाची संकल्पना वर पक्षाचे नातेवाईक व करमाळा येथील विद्या विकास शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री विलासराव घुमरे सर यांच्यापुढे मांडली. त्यांनी लागलीच वर पक्षाचे मातापित्यांची चर्चा करून या विवाहाला संमती दिली.

काल सोमवारी सायंकाळी सात वाजता गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा दोन्हीकडील वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत पार पडला .आपल्या कीर्तनातून समाजसुधारणेचा संदेश देणाऱ्या कीर्तनकारांनी प्रत्यक्षात आचरण करून समाजापुढे नवीन आदर्श घालून दिला आहे.
समाजाने अशा पद्धतीचे विवाह सोहळे साजरे केले तरच समाजाची आर्थिक प्रगती होईल व समाज सुधारेल असे मत विलासराव घुमरे सर यांनी व्यक्त केले.