नगरपरिषद निवडणुक- जगताप गटातील नगराध्यक्ष पदाचे उमेदवारीवरुन स्पष्ट संकेत ; विरोधकांना कोडीत पकडण्याचा डाव
करमाळा समाचार – विशाल (नाना) घोलप
करमाळ्याच्या राजकारणात कधी कोणता प्रसंग घडेल व कधी काय घडेल याची शक्यता कोणीच वर्तवू शकत नाही. अचानकच निर्णय घेतले जातात, बदलले जातात व गणित घडले – बिघडले जातात. अशातच आता महिला राखीव मतदारसंघ हा नगरपरिषदेला आरक्षित झाल्यामुळे अनेकांना असेही वाटले असेल की जगताप गटाकडे मागील 30 वर्षांपासून ताब्यात असलेल्या नगरपरिषदेत महिला उमेदवार नसल्याने मागे पडेल की काय ? पण जगतापांनी त्याहून बहत्तर असा हुकमी एक्का बाहेर काढायचं ठरवल्याचे संकेत नुकतेच दिले आहेत.

करमाळ्याच्या राजकारणात आतापर्यंत जगताप घराण्यातील पुरुषांकडून राजकारण पाहायला मिळाले. प्रत्येक विभागात कोणते ना कोणतं पद भूषवलेले जगताप घराणे आता पहिल्यांदाच महिला उमेदवार समोर करू शकतात असे दिसून येत आहे. कारण ही तसंच घडलं आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये मागील वेळी वैभवराजे जगताप यांनी नगराध्यक्षाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर प्रशासक लागले व बऱ्याच काळानंतर आता निवडणुका जाहीर होतील. त्यापूर्वी आरक्षण जाहीर झाले व सदरची जागा ही महिला राखीव राहिल्याने आता मात्र पुरुषांना त्या ठिकाणी उभारण्याची संधी मिळणार नाही.
त्यामुळे गटातील उमेदवार समोर आणल्यास विरोधी गट हे घरातील उमेदवार देऊन कार्यकर्त्या महिला उमेदवारापुढे आव्हान उभे करु शकतात. त्यामध्ये सावंत परिवार व घुमरे परिवारासह देवी गटाच्याही घरातील नावाची चर्चा आहे. म्हणून कार्यकर्त्याला संधी देऊन स्पर्धा वाढवण्यापेक्षा जगताप यांच्या पत्नी नंदिनीदेवी जगताप यांना समोर आणून विरोधकांना अडचणीत आणण्याचा डाव सध्या जगताप गटाकडून खेळला जाण्याची शक्यता आहे. नुकतंच माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेतल्या. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी नंदिनी देवी याही सोबत होत्या.

त्यामुळे नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये जगतापांकडून नंदिनीदेवी यांचेच नाव समोर येण्याची दाट शक्यता वाढली आहे. असे झाल्यास शांत, संयमी चेहरा जगताप गटाकडून समोर येऊ शकतो. त्यामुळे विरोधी गटाकडून सामान्य कार्यकर्ता किंवा नेत्यांच्या घरातील उमेदवार द्यावा यासाठी चाचणी केली जाऊ शकते. परंतु सौ नंदीनी देवी जयवंतराव जगताप यांच्या संभाव्य उमेदवारीच्या निर्णयाने मात्र जगताप गटात उत्साहाचं वातावरण नक्कीच निर्माण होईल व नगरपरिषदेवर पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी ही जमेची बाजू ठरू शकते.
मागील निवडणुकीमध्ये बागल गटासोबत आघाडी करून निवडणूक लढली व जिंकली परंतु आता यंदाच्या निवडणुकीत कोणता गट आणि कोणता पक्ष सोबत घेऊन लढायचे याचीही चाचपणी सुरू आहे. यात बदल घडलेले दिसून येऊ शकतात. परंतु सध्या तरी जगताप गटाकडून चाचपणी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
