ओहरफ्लोचे पाणी मांगी, वीट, कुंभेज, कुंभारगाव, कोर्टी यासह इतर तलावांमध्ये ; बागल यांच्या मागणीला यश
करमाळा समाचार
कुकडी प्रकल्पाच्या धरणांमधील ओहरफ्लोचे पाणी करमाळा तालुक्यातील मांगीसह इतर सर्व तलावांमध्ये सोडण्याची कार्यवाही सुरू झाली असल्याची माहिती आज भाजपा जिल्हा युवा नेते व मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी आज येथे दिली.

याबाबत अधिक माहिती देताना श्री बागल म्हणाले की, कुकडी धरणांच्या लाभक्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने धरणांमधील सोडले जाणारे ओहरफ्लो चे पाणी करमाळा तालुक्यातील मांगी, वीट, कुंभेज, कुंभारगाव, कोर्टी यासह इतर तलावांमध्ये सोडण्याबाबत निवेदन जिल्हाधिकारी व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना आपण स्वतः सोलापूर येथे भेटून दिले होते.

यावर सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद यांनी शासनाला अहवाल सादर करून ओव्हरफ्लोचे पाणी सोडणे बाबत जलसंपदा विभागाला पत्रव्यवहार केला होता. त्याप्रमाणे अखेर कुकडी धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी प्रत्यक्षात मांगी तलावामध्ये सुरू झाले असून इतर सर्व तलावांमध्ये देखील ते काही दिवसात सोडण्यात येईल असे श्री. बागल यांनी सांगितले.