दरोडा टाकण्यासाठी आलेल्यापैकी एक पडला विहिरीत ; इतरांचा शोध सुरु
करमाळा समाचार
कोर्टी ता. करमाळा येथे मध्यरात्री एक ते दीडच्या दरम्यान पाच ते सहा जणांनी एका घरावर दरोडा टाकण्यासाठी आले व गोंधळ उडाल्याने मोबाईल घेऊन पळताना एक विहिरीत पडल्याने जागेवर मिळून आला आहे. तर पाच जण फरार आहेत. यावेळी झालेल्या दगडफेकीत दोन जण जखमी झाल्याची घटना कोर्टी ता. करमाळा येथे मध्यरात्री एक ते दीड च्या सुमारास घडली आहे.

नितीन उर्फ नीतू वैशा भोसले रा. भेंडाळा ता. गंगापूर जि. औरंगाबाद यासह पाच अनोळखी दरोडेखोरांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील भोसले याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पळताना जखमी झाल्याने त्याला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अनिल शिंदे (वय ५०) रा. कोर्टी यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिंदे हे गावापासून काही अंतरावर असलेल्या ठाकर वस्ती येथे राहतात. रविवारी मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास राहत्या घराच्या खिडकीतून बॅटरीचा उजेड दिसून आला. यावेळी बाहेर येऊन पाहिले असता अनोळखी पाच ते सहा जण दबा धरुन बसले होते. यावेळी त्यांनी पाठीवर कुर्हाडीच्या दांडक्यांनी व पायावर धारदार शस्त्राने मारहाण करून जवळ असलेला मोबाईल काढून घेतला. यावेळी गोंधळ ऐकून शिंदे यांचा भाऊ कुमार हा मदतीला आल्यानंतर चोरटे पळून जाऊ लागले.

यावेळी पळताना त्यांनी दगडफेक केली.यात कुमार हा जखमी झाला. तर पळताना यातील आरोपी भोसले हा जवळच असलेल्या विहिरीत जाऊन पडला. यामुळे तो पोलिसांच्या तावडीत सापडला तोही जखमी झाल्यामुळे त्याच्यावर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी अजित पाटील, पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे व गुन्हा प्रकटीकरण विभागाचे पथक हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी इतर आरोपींचा शोध घेण्याची सुरुवात केली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर हे करीत आहेत.