वडशिवणे येथे सशस्त्र दरोड्यात एक गंभीर जखमी
करमाळा समाचार
तालुक्यातील वडशिवणे येथे चार दरोडे खोरांनी सशस्त्र दरोडा टाकून चार लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. तर घरातील एकाला जबर मारहाण केल्याने गंभीर अवस्थेत सोडून पळ काढला आहे. सदरची घटना दि २ रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी अनोळखी चौघांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची तक्रार वनरक्षक शकील कांतीलाल मणेरी यांनी दिली आहे

शकील मनेरी हे हिमायतनगर प्रादेशिक वन विभाग कार्यालय नांदेड येथे वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते भोकर तालुका भोकर जिल्हा नांदेड येथे नोकरीच्या निमित्ताने राहण्यास आहेत. तीन दिवसांपूर्वी आईच्या वडिलांचे निधन सर्व कुटुंबीयांसह शकील हे वडशिवणे येथे आले होते. दि १ जून रोजी त्यांचा भाऊ सलीम हा दिवस पाळी व रात्रपाळीच्या ड्युटीसाठी भगीरथी पेट्रोल पंप शेलगाव येथे गेला होता. यावेळी कुटुंबीयांसह शकील हे घरामध्ये झोपले होते.
यावेळी मध्यरात्री दोन वाजता घराच्या लोखंडी दरवाजाचा आवाज आल्याने त्यांना जाग आली. त्यावेळी पाहिले असता समोर चार अनोळखी लोक अंदाजे २० ते ३० वर्षाचे हाताच्या चाकु घेऊन व अंगात काळ्या रंगाचे कपडे घातलेले, शिवाय केसावर सोनेरी रंग लावलेल्या अवस्थेत घरामध्ये घुसले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून घरातील पैसे चाचपणी सुरू केली. यावेळी पिशवीतील रोख रक्कम घेतली. तर आईला चाकूचा धाक दाखवून कानातील सोन्याचे फुले हिसकावून घेतले. यावेळी शकील हे चोरांना धक्का देऊन बाहेर पळाले. तेवढ्यात त्यांच्या आईचा आवाज आला व शकील माघारी फिरले असता चोरट्यांनी तोपर्यंत वडिलांच्या नाकावर, गालावर व डोक्यात चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते.

त्यानंतर वडिलांना टेंभुर्णी येथे खाजगी दवाखान्यात दाखल केले. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. यावेळी घरी पाहणी केली असता दोन ग्रॅम वजनाचे सोन्याची फुले, सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी, सहा ग्रॅम वजनाची बोरमाळ, पाच ग्रॅम वजनाची अंगठी व तीन लाख ४४ हजार रोख रक्कम असे एकूण चार लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी घेऊन गेले आहेत. सदर घटनेचा करमाळा पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास करमाळा पोलीस करीत आहे.
