विधानसभेला पाटील – शिंदे पुन्हा एकदा आमनेसामने ! ; शिंदेंची अपक्ष लढण्याची शक्यता – जगतापांच्या भुमिकेकडे लक्ष
करमाळा समाचार
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा एकतर्फी विजय झाल्या नंतर करमाळा तालुक्यातील मताधिक्याच्या जोरावर सध्या राष्ट्रवादी (श.प.) तालुक्यात अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. तर विधानसभेला कोणते उमेदवार पुढे येणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. सध्याची परिस्थिती पाहता महाविकास आघाडी कडून माजी आमदार नारायण पाटील तर महा युतीकडून विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांची नावं चर्चेत आहेत.

लोकसभा निवडणुकांमध्ये शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटातही उत्साहाचे वातावरण निर्मिती झाली आहे. मागील पाच वर्षात पाटील यांनी सक्रिय सहभाग, विकास कामात योगदान व तालुक्यातील प्रमुख दावेदार अशी जमेची बाजु असताना जरांगे फॅक्टर, शेतकऱ्यांचे प्रश्न, जाती-जातीतील वाद अशा मुद्द्यांमुळे महायुती विरोधात वातावरण असल्याचे दिसून येते. त्यामुळे माजी आमदार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वेगळा उत्साह पाहायला मिळत आहे.

तर लोकसभा व विधानसभा या निवडणुकीतील मतदानाचे अंतर कमी करण्यासाठी किंवा बदल घडून आणण्यासाठी विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचा गट ही सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. त्यांनी संपूर्ण ताकद पणाला लावत पुन्हा एकदा तालुक्यातील मतदारांपर्यंत पोहचण्याचे काम करीत आहेत. आता फक्त महायुतीकडुन लढायचे का पुन्हा एकदा अपक्ष लढायचे याबाबत चाचपणी सुरु आहे. पण पुन्हा अपक्ष लढण्याचे ठरल्यास महायुतीमधील मित्रपक्ष संजयमामांना पाठिंबा देत उमेदवार देणे टाळतील का ? किंवा उमेदवार देतील यावर निकाल अवलंबुन राहु शकतो.
याशिवाय तालुक्यात निर्णायक असे मतदान असलेले माजी आमदार यांची भुमीका महत्वाची असते. जगताप यांनी काही दिवसापुर्वी संजयमामांना आमदार करा अशी भुमीका घेतली होती. तर लोकसभेला त्यांच्या गटाने मोहिते पाटील यांच्या विजयात मोलाचा सहभाग नोंदवला आहे. तर येणाऱ्या काळात जगतापांची भुमीका निर्णायक मानली जातेय. याशिवाय रश्मी बागल या बीजेपीत असल्याने त्यांना युतीचा धर्म पाळावा लागेल पक्षाचा आदेश मानावा लागणार आहे. त्यामुळे शिंदे अपक्ष लढल्यास बीजेपी या जगताप व बागल या दोघांपैकी कोणाला उमेदवारी देईल का शिंदे यांना पाठिंबा देईल यावर सर्व अवलंबुन राहिल.